नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होण्याची चिन्हे आहेत. अशा पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जयंत जाधव हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे चर्चांना सध्या जोर आला आहे. यासंदर्भात एक घटना घडणार असल्याने त्यास बळ मिळाले आहे.
जयंत जाधव हे विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे ते अतिशय विश्वासू सहकारी सजमले जातात. भुजबळांमुळेच जाधव हे आमदार झाल्याचा इतिहास आहे. आता मात्र हेच जाधव सत्ताधारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चिन्हे आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते आज विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. याचबरोबर सामंत हे जयंत जाधव यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे शिंदे गट आणि जाधव समर्थकांकडून सांगितले जात आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधव हे शिंदे गटात दाखल होत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अर्थात शिंदे गट किंवा जाधव यांनी याचे समर्थन केलेले नाही. पण, सामंत यांच्या जाधवांच्या निवासस्थानी जाण्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांचा हंगाम जोरात असल्याचे दिसून येत आहे.
NCP Ex MLC Jayant Jadhav Shinde Group Politics