त्र्यंबकेश्वर – बाराव्या शतकातील मराठी भाषा दृष्टिहीनांना कळावी, त्यांना अध्यात्मज्ञान मिळावे या हेतूने दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन व महामंडलेश्वर ह. भ. प. रघुनाथदास देवबाप्पा माऊली धाम यांच्या आशीर्वादाने संपन्न झालेले दृष्टिहीनांचे ज्ञानेश्वरी पारायण हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. असे उपक्रम विविध ठिकाणी राबवावेत. असे गौरवोद्गार विभागिय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्र्यंबकेश्वर येथे व्यक्त केले. राष्ट्रसंत श्री जर्नादन स्वामी महाराज मठात संपन्न झालेल्या पारायण समारोप प्रसंगी ते बोलत होते.


आजही ग्रामीण भागात अधांबाबत म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही आणि ती जनजागृती व्हावी या उद्देशाने तसेच दृष्टिहीनांना अध्यात्मज्ञान मिळावे या हेतूने दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन व महामंडलेश्वर ह. भ. प. रघुनाथदास देवबाप्पा माऊली धाम यांच्या आशीर्वादाने त्र्यंबकेश्वर येथील राष्ट्रसंत श्री जर्नादन स्वामी महाराज मठात महाराष्ट्रात प्रथमच ३ दिवसाचे दृष्टिहीनांचे ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाले. या उपक्रमाचा समारोप समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन विभागिय आयुक्त राधाकृष्ण गमे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसिलदार दिपक गिरासे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, माऊली धामचे महामण्डलेश्वर ह.भ.प. रघुनाथ महाराज तथा देवबाप्पा, पोउनि चंद्रभान जाधव, चाटे कोचिंग क्लासेसचे मच्छींद्र चाटे, श्रीसंत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानचे माजी अध्यक्ष पवनकुमार भुतडा, माजी विश्वस्त तथा दिंडीप्रमुख पुंडलीक थेटे, दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भास्कर, जेष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, आळंदी येथील श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. संदिपान महाराज, संदिप जाधव, किरण चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवराचे हस्ते श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक राधाकृष्ण गमे यांचे हस्ते कार्यक्रमास उपस्थित असलेल्या दृष्टीहीन व्यक्तींना मतदान संदर्भातील कार्यपद्धती तसेच मतदार नाव नोंदणी प्रक्रियेची माहिती देणेकरीता भारत निवडणूक आयोग यांचेकडील ब्रेल लिपीतील माहितीपुस्तिका स्वीप अंतर्गत वाटप करण्यात आल्या. तसेच दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे संस्थेसाठी जागेची मागणी करण्यात आली त्यावर तहसिलदारां मार्फत तसा प्रस्ताव पाठवावा, आपण तो लगेच मार्गी लावु असे गमे यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट करतांना देवबाप्पा यांनी सांगितले की, महाराष्ट्रातच नव्हे तर जगामध्ये ज्ञानेश्वरी सर्वोत्तम संस्कृती आहे, अशी संस्कृती सर्वांनी जगावी यासाठी सदर उपक्रम राबविला असुन पुढील वर्षी मुकबधीर लोकांचा हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्याचा मानस अाहे, ज्यांना जे हवे आहे ते त्यांना देण्याचा माझा धर्म आहे असे त्यांनी सांगितले. सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.