मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाहन चालकांनी कोणतेही वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असते. काही वाहन चालक नियमांचा भंग करतात साहजिकच वाहतूक पोलीस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात. त्यासाठी पोलिसांना ई-चालान मशीन देण्यात आले आहे. मात्र काही वाहतूक पोलीस त्याऐवजी खासगी मोबाईलवर फोटो काढतात, मात्र त्यांना यापुढे असे करता येणार नाही. तसे आदेशच अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
वाहतूक नियम मोडल्यानंतर खासगी मोबाईलने गाडीचे फोटो काढणे यापुढे वाहतूक पोलिसांच्या अंगलट येऊ शकते. खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत के सारंगल यांनी परिपत्रकाद्वारे कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस कायमच दबा धरून बसलेले असतात. वाहतूक पोलिसांना ई-चालान मशीन दिली गेली असताना देखील सर्रास खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले जातात.
काही वेळा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होत आहे हे कळतसुद्धा नाही. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचे चालान पाठवले जाते. मात्र, आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे. याबाबत वाहतूक विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.
वाहतूक विभागाचे कुलवंत सारंगल यांनी या संदर्भात आदेश काढला आहे. यापुढे वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई-चालान मशीनचाच वापर करावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाईच्या वेळी खासगी मोबाईलचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असा आदेश कुलवंत सारंगल यांनी दिला आहे. अनेकदा वाहतूक पोलिस सिग्नल संपला किंवा वळण संपले की दबा धरून थांबलेले असतात. अनेकदा आपल्याला नियमांची माहिती नसते आणि ते तो नियम दाखवून पावती फाडतात. वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वतःच्या खासगी मोबाईलवर वाहनाचा फोटो वा चित्रीकरण करून काही कालावधी नंतर ई चलान मशिनमध्ये फोटो अपलोड करतात. तसंच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात. त्यामुळे वाहन कोणते आहे ओळखणे कठीण होते. यापुढे गाडीचा संपूर्ण फोटो काढणे बंधनकारक असणार आहे.
Traffic Police Rules New Order Do’s Don’ts