मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘तारक मेहताका लटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील नवीन वाद चर्चेत आला आहे. मालिकेतील एका अभिनेत्रीने निर्मात्यावर आरोप लावले असून त्यावर निर्मात्यानेही प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, या अभिनेत्रीने आता ही मालिका सोडली आहे.
मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवालने निर्माते आणि प्रॉडक्शन टीमवर गंभीर आरोप केले आहेत. जेनिफरने असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर तिने मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात असित मोदी आणि त्यांच्या प्रॉडक्शन टीममधील इतर दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याविरोधात आता प्रॉडक्शन टीम आणि निर्माते असित कुमार मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
या सर्वांनी जेनिफरने केलेले आरोप फेटाळले आहेत. ती सेटवरील शिस्त पाळत नव्हती आणि तिचं कामावरही लक्ष नसायचं. तिच्या वागणुकीबद्दल आम्हाला सतत प्रॉडक्शन हेडकडे तक्रार करावी लागायची. तिच्या शेवटच्या दिवशीसुद्धा ती संपूर्ण युनिटसमोर उद्धटपणे वागली आणि शूट न संपवताच निघून गेली, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शन टीममधील हर्षद जोशी, ऋषी दवे आणि अरमान यांनी दिली. ‘ती आमची आणि मालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिचा करार संपवल्याने ती आता तथ्यहीन आरोप करतेय’, असे असितकुमार मोदी म्हणाले.
काय आहेत आरोप?
मोदींनी केलेल्या काही कमेंट्समुळे जेनिफरला अनकम्फर्टेबल वाटले होते. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, २०१९ मध्ये जेव्हा ‘तारक मेहता..’ची टीम शूटिंगसाठी सिंगापूरला गेली होती, तेव्हा असित मोदींनी तिच्या ओठांबाबत कमेंट केली होती. ‘जेनिफर तुझे ओठ मला खूप आवडतात, असे वाटते किस करावे’, हे ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्याच ट्रिपमध्ये असित मोदींनी असेही तिला म्हटले की,‘मुनमुन तर रात्री बाहेर जाईल, तू एकटी काय करशील? ये आपण सोबत व्हिस्की पिऊयात.’
TMKOC Producer Modi Allegation Actress Left Serial