अश्विनी भाटवडेकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अल्पावधीतच छोट्या पडद्यावर लोकप्रिय झाली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, प्रेक्षकांना काय हवे हे ओळखून मालिकेची केलेली निर्मिती आणि यातील कलाकारांचा सकस अभिनय. पण, काही काळापासून या मालिकेतील अनेक कलाकार सातत्याने मालिका सोडून जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मालिकेच्या टीआरपीवर जरी काही परिणाम झाला नसला तरी प्रेक्षक नाराज होताना दिसत आहेत. या सगळ्या परिणामांची वेळीच दखल घेऊन मालिकेच्या निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मालिकेतील कलाकारांसोबत एक कॉन्ट्रॅक्ट केले जाणार आहे. त्यानुसार हे कलाकार मालिका सोडून जाऊ शकणार नाहीत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली १४ वर्षे छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. इतक्या वर्षांत अनेक कलाकार ही मालिका सोडून गेले. मालिकेतील दयाबेन ही व्यक्तिरेखा साकारणारी दिशा वकानी देखील गेली. ती पुन्हा परतून आली नाही. तरीही या मालिकेची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. मात्र, अलीकडेच या मालिकेतील बरेच कलाकार एका पाठोपाठ एक मालिका सोडून गेले. आणि यामुळे मालिकेचे चाहते नाराज आहेत.
मालिकेचे निर्माता असित मोदी यांनी यावर एक तोडगा काढला आहे. मालिकेतील सर्व कलाकारांसाठी मोदी यांनी एक कॉन्ट्रॅक्ट तयार केले आहे. ज्यामुळे हे कलाकार मालिका सोडून जाऊ शकणार नाहीत. हे कॉन्ट्रॅक्ट योग्य आहे का आणि याची खरंच काही गरज होती का, याचे उत्तर मोदी यांनीच दिले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केलं. कारण या मालिकेतील व्यक्तिरेखा या केवळ याच कार्यक्रमापुरत्या मर्यादित होत्या. त्या अन्यत्र कुठेही दिसत नव्हत्या. त्यामुळे त्याचे एक वेगळे महत्त्व होते. पण, कलाकार मालिका सोडून जाऊ लागले आणि दुसऱ्या कार्यक्रमांमध्येही दिसू लागले. त्यामुळे सहाजिकच मालिकेचे महत्त्व कमी होणार.
ही मालिका म्हणजे माझ्यासाठी एक कुटुंब असल्याचे मोदी सांगतात. त्यामुळे या कुटुंबातून कोणीही लांब गेले की मला दुःख होते. या सर्वांना मी मालिकेत आणलं आहे. सगळ्यांनी सोबत राहून यशाचा आनंद घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे. पण कोणाला सोबत राहायचे नसेल तर मी काय करू शकतो? अशी खंतही ते व्यक्त करतात. तारक मेहता यांची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी नुकतीच ही मालिका सोडली आहे. त्यांनी याविषयी काही माहिती दिली नसली तरी ते सध्या दुसऱ्या कार्यक्रमात दिसत आहेत. याबाबत मोदी म्हणतात की, कोणी मालिका सोडून गेल्याने कार्यक्रम काही थांबत नाही. जुने कलाकार आले तर त्यांचे स्वागतच आहे. नाही आले तर नवीन तर्क मेहता निश्चितच येतील.
TMKOC Show Entertainment Actors Left Producer
Tarak Mehta ka Ooltha Chashmah TV Serial Comedy