मुंबई – एकीकडे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे मात्र कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही, असा दावा पद्मश्री पुरस्कार प्राप्त वरिष्ठ वैज्ञानिक, आयआयटी कानपूर, प्रा. मनींद्र अग्रवाल यांनी केला आहे. कोरोना साथीविषयी नवीन अभ्यास प्रा. अग्रवाल यांनी मॉडेलवर आधारित गणिती सूत्र जारी केले आहे. त्यानुसार संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आता नगण्य आहे, असे ते म्हणतात. याचे मुख्य कारण मोठ्या प्रमाणात लसीकरण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संसर्ग आता हळुहळु कमी होईल. त्याच वेळी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली सारखी राज्ये कोरोनापासून जवळजवळ मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.
प्रा. अग्रवाल यांच्या अभ्यासानुसार, देशातील कोरोनाची सक्रिय प्रकरणे ऑक्टोबरपर्यंत १५ हजारांच्या जवळपास असतील. याचे कारण असे की तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, आसाम, अरुणाचलसह ईशान्येकडील राज्यांमध्ये संसर्ग होतच राहतील. अभ्यासाद्वारे अहवाल जारी करून प्रा. अग्रवाल सरकारला सतत सतर्क करत आहेत. दुसऱ्या लाटेचा त्यांचा दावा बऱ्याच अंशी खरा ठरला.
तिसऱ्या लाटेची शक्यता जवळजवळ शून्य असल्याचा दावा करत त्यांनी ऑक्टोबरपर्यंत आपला नवीन अंदाज खरा होईल, असा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार ऑक्टोबरपर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेशमधील कोरोनाची सक्रिय प्रकरणे कमी जास्त पातळी गाठतील.
प्रा. अग्रवाल यांच्या मते, लॉकडाऊन आणि लशीकरणाचा बराच फायदा होताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेनंतर सामुहिक प्रतिकारशक्ती अनेक लोकांमध्ये विकसित झाली आहे. त्याचबरोबर, वेगाने चालणाऱ्या लशीकरण मोहिमेचा प्रभाव साथीच्या रोगाला रोखण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल.
तिसरी लाट येण्याच्या शक्यतेबद्दल शास्त्रज्ञ सतत चिंतेने वेगवेगळे दावे करत होते. त्यावेळी प्रा. अग्रवाल हे दुसऱ्या लाटेनंतर मे महिन्यापासून सांगत होते की, तिसरी लाट प्रभावी होणार नाही. तसेच ती दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमकुवत असेल. जर लसीकरण योग्यरित्या केले गेले आणि जर लोकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन केले तर तिसरी लाट अस्तित्वात नसेल, असेही ते म्हणाले होते. आणि प्रा. अग्रवाल यांचे दावे खरे ठरले.