नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तीन बांगलादेशी घुसखोरांना नाशिक एटीएस व इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमध्ये हे तिन्ही बेकायदेशिररित्या वास्तव्य करत होते. या कारवाईत पोलिसांनी एका स्थानिक संशयितासही ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुस्समत शापला खातून (२६), शागोर मोहंमद अब्दुल हसुने माणिक (२८), इति खानम मोहंमद शेख (२७) यांच्यासह संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव (३२) यांचा समावेश आहे. हे सर्व जण
पाथर्डी गावात काजी मंजील येथे वास्तव्य करत होते. त्यांना संशयित जाधव यांनी मदत केल्याचे समोर आले आहे.
संशयितांविरुद्ध दहशतवादविरोधी पथक(एटीएस) नाशिक युनिटच्या सहायक निरिक्षक योगिता पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इंदिरानगर पोलीस तपास करत आहेत.
संशयास्पद वस्तू नाही
या बांगलादेशी नागरिकांकडे कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा पुरावे आढळलेले नाहीत. केवळ वास्तव्यासाठी थांबून असल्याचे तपासात पुढे आले असले तरी पोलिस कसून तपास करत आहे. सध्यातरी कोणताही घातपाताचा इरादा नसल्याचे नाशिक शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.