नवी दिल्ली – तालिबानने वीस वर्षांनंतर काबुलमध्ये पुन्हा सत्ता हाती घेतली आहे. २००१ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यामुळे तालिबानच्या बंडखोरांनी काबुल सोडून पलायन केले होते. त्यानंतर तालिबानने आता पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मुल्ला अब्दुल गनी बरादर चार जणांपैकी एक आहे ज्यांनी १९९४ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानच्या आंदोलनाची सुरुवात केली होती. तालिबानच्या हातात शांततापूर्ण सत्ता हस्तांतरणानंतर मुल्ला अब्दुल गनी बरादर अफगाणिस्तानचा राष्ट्रपती होऊ शकतो. तालिबानने त्याला भावी राष्ट्रपती घोषित केले आहे.
कोण आहे मुल्ला बरादर
२००१ मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने तालिबानविरुद्ध युद्ध छेडले. तालिबान शरण आल्यानंतर मुल्ला बरादरने दहशतवादाचे नेतृत्व स्वीकारले. त्याला फेब्रुवारी २०१० मध्ये अटक करण्यात आली. त्याला पाकिस्तानच्या कराचीमधून अमेरिका-पाकिस्तानच्या संयुक्त अभियानात पकडण्यात आले. २०१२ च्या अखेरपर्यंत मुल्ला बरादरची जास्त चर्चा झाली नाही. तालिबान कैद्यांच्या यादीत त्याचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर होते. शांतता चर्चेसाठी त्याला अफगाणिस्तान सुटका करू पाहात होते.
तालिबानमध्ये मुल्लाचे महत्त्व
तालिबानसोबत करार झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने २०१८ मध्ये त्याची सुटका केली होती. परंतु त्याला पाकिस्तानमध्ये ठेवले जाणार की परदेशात पाठविले जाणार याबाबत स्पष्ट करण्यात आले नव्हते. मुल्ला बरादर याचे महत्त्व या गोष्टीवरूनही समजेल की, अटकेदरम्यान तालिबानचा नेता मुल्ला मोहम्मद उमरच्या सर्वात विश्वासू कमांडरपैकी तो एक मानला जात होता. तसेच त्याला दुसरा इन कमांड सुद्धा मानले जात होते. अमेरिका आणि अफगाणिस्तान सरकारसोबत शांतता चर्चेचे समर्थन करणारा नेता म्हणूनही त्याला ओळखले जात होते. तालिबानच्या शांतता दलाचा तो नेता आहे. तो कतारची राजधानी दोहामध्ये एका राजकीय कराराचा प्रयत्न करण्याचा देखावा करत आहे.
अमेरिकेमुळे तालिबानचा जन्म
अफगाणिस्तानात तालिबानचा उदय अमेरिकेमुळेच झाला आहे. तेच तालिबान आता अमेरिकेची डोकेदुखी ठरत आहे. १९८० मध्ये सोव्हियत संघाने अफगाणिस्तानात सैन्य उतरवले होते. तेव्हा अमेरिकेने स्थानिक दहशतवाद्यांना हत्यारे आणि प्रशिक्षण देऊन युद्ध लढण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. सोव्हियत संघाचा पराभव होऊन सैन्य परतले खरे. पण नंतर अफगाणिस्तानात तालिबान या कट्टरपंथी दहशतवादी संघटनेचा उदय झाला.
कसे काम करते तालिबान
अमीर अल-मुमिनीन हा तालिबानमधील सर्वात मोठा नेता आहे. राजकीय, धार्मिक आणि सैन्य गोळा करण्यासाठी जबाबदार मानला जातो. सध्या या पदावर मौलवी हिबतुल्लाह अखुंदजादा आहे. तो तालिबानचा मुख्य न्यायाधीश होता. त्याचे तीन सहाय्यक आहेत. राजकीय सहाय्यक- मुल्ला अब्दुल गनी बरदार, अखुंदजादाचा राजकीय सल्लागार आहे. तालिबानचा उपसंस्थापक आणि दोहा येथील कार्यालयातील प्रमुख आहे. धार्मिक मुद्याच्या सहाय्यकपदी सध्या तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकूब हा आहे.
अमेरिकेशी चर्चेचे नाटक
अमेरिका आणि तालिबानदरम्यान २०१८ पासून चर्चा सुरू झाली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये दोन्ही बाजूने एक करार करण्यात आला होता. अमेरिका अफगाणिस्तानमधून आपल्या सैनिकांना माघारी बोलावेल तसेच अमेरिकेच्या सैनिकांवर तालिबान हल्ला करणार नाही, असा करार करण्यात आला होता. कराराच्या इतर आश्वासनांनुसार, अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांना आपल्या नियंत्रणाखालील परिसरात तालिबानने वाढू देऊ नये. तसेच अफगाणिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करेल. अमेरिकेने आपले सैन्य माघारी नेण्यास सुरुवात केली खरी परंतु तालिबानने शांतता कराराला धाब्यावर बसवून अफगाणिस्तानवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे.