नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) पाच जणांची चार दिवस एटीएस कोठडी राखून ठेवत न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्षाने सोमवारी पाच जणांकडून ‘हार्ड डिस्क’ जप्त करण्यात आली असून त्यात २०४७ पर्यंत ‘पीएफआय’ला भारत संपूर्णत: मुस्लिम राष्ट्र करायचे होते. यासह आयोध्येतल्या राम मंदिराच्या जागेवर पुन्हा बाबरी मशिद उभी करण्यासाठी विघातक कारवाया करण्याचा त्यांचा ‘प्लॅन’ होता, हे समोर आल्याचे सांगितले.
अटक करण्यात आलेल्या पाच जणांना पहिल्यांदा बारा दिवस आणि त्यानंतर चौदा दिवस एटीएस कोठडी सुनावण्यात आली. ही कोठडी संपल्यानंतर सोमवारी पाचही जणांना एटीएसने न्यायालयात हजर केले. यावेळी ३ ऑक्टोबर रोजी केलेल्या दाव्यांनुसार तपासातील मुद्दे मांडून पाचही जणांच्या विघातक कृत्यांच्या प्रयत्नांसंदर्भातील माहिती न्यायालयात देण्यात आली. दरम्यान, ‘पीएफआय’ संदर्भात तांत्रिक विश्लेषणातून तपास करण्यात आला. त्याद्वारे मिळालेली माहिती न्यायालयात सादर करण्यात आली. हार्ड डिस्कसहित मोबाइल व इतर साहित्य जप्त केले आहे. चार दिवस राखून ठेवलेल्या कोठडीत वेळोवेळी तपास केला जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली.
हे आहेत आरोपी
दहशतवाद्यांना पैसे पुरविण्यासह समाजात अशांतता पसरविण्याचा कट रचल्याचा संशयात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) मालेगावातून दोन आणि राज्यातून इतर तिघांना एटीएसने अटक केली होती. त्यामध्ये ‘पीएफआय’ या वादग्रस्त संघटनेच्या मालेगाव जिल्हाध्यक्ष मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (वय २७, रा. हुडको कॉलनी), यासह पुण्यातील उपाध्यक्ष अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (वय ४८, रा. कोंडवा), वरिष्ठ नेता रझी अहमद खान (वय ३७, रा. कोंडवा खुर्द), सदस्य वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (वय २९, रा. अझीझपुरा, बीड) आणि विभागीय सचिव मौला नबीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर) यांचा समावेश आहे.