पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात बाजारात अनेक प्रकारच्या आकर्षक दुचाकी दिसून येतात. परंतु त्यात दणकट आणि स्पोर्टी लूक असलेल्या दुचाकींना तरुणांमध्ये विशेष क्रेझ दिसून येते. त्याचप्रमाणे अॅडवेंचर किंवा स्पोर्टसाठीच्या दुचाकी घेण्याकडे देखील तरुणांचा कल वाढला आहे.
विशेषतः अॅडवेंचर, साहसी पर्यटन आणि हिमालय ट्रेक सहली सारख्या लाँग रूट साठीच्या दुचाकींची विशेष मागणी दिसून येते. त्यामुळेच आता बेनेली इंडीया कंपनीने आज आपली नवीन एंट्री-लेव्हल अॅडव्हेंचर मोटरसायकल TRK 251 लाँच केली आहे, तिची साधारणतः किंमत 2.51 लाख रुपये आहे.
बेनेली इंडीया TRK 251 चे बुकिंग आधीच सुरु झाले आहे. आता लवकरच ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल. सुमारे 6 हजार रुपयांच्या टोकन रकमेवर मोटारसायकल बुक करता येते. TRK 251 3 वर्षांच्या अमर्यादित किलोमीटर वॉरंटीसह येते.
नवीन TRK 251 मध्ये 250cc चार-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. इंजिन 9250 rpm वर 25.8 PS ची पीक पॉवर आणि 8000 rpm वर 21.1 Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनसह येते. ही नवीन मोटरसायकल रॉयल एनफिल्ड हिमालयन आणि KTM 250 ड्युके शी स्पर्धा करणार आहे.
नवीन TRK 251 चे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची 18-लिटरची मोठी इंधन टाकी जी टूरिंग क्रेडेन्शियलसाठी योग्य आहे. याला 170mm चा चांगला ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. TRK 251 तीन रंग पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे – ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी ब्लॅक आणि ग्लॉसी ग्रे.
TRK 251 लाँच करताना, बेनेली इंडीयाचे एमडी विकास झबाख म्हणाले की, आम्ही भारतात साहसी वाहन लॉन्च करण्यास उत्सुक आहोत. TRK 251 ही एक उच्च कार्यक्षमता साहसी टूरर आहे जी मोहक डिझाइन, आक्रमक शैली, अल्ट्रा-आरामदायी, अर्गोनॉमिक्स आणि उच्च कार्यक्षमतेसह देण्यात येते. TRK 251 लाँच केल्यावर, भारतातील बेनेली कंपनीतत आणखी ग्राहक सामील होण्याची अपेक्षा आहे.