इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संपूर्ण देशात आज प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरी करत आहे. परंतु नागालँडमधील अनेक आदिवासी गट आणि नागरी समाज संघटनांनी २६ जानेवारीच्या उत्सवात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँडमधील मोन जिल्ह्यात गेल्या वर्षी ४ आणि ५ डिसेंबर रोजी सुरक्षा दलांच्या कारवाईच्या निषेधार्थ या गटांनी हा निर्णय घेतला आहे. या कारवाईत चौदा नागरिकांचा मृत्यू झाला होता.
ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन (ईएनपीओ) या मोन, तुनसांग, लाँगलेंग, किपाहेर आणि नोक्लाक या पाच जिल्ह्यांतील नागा जमातींच्या संघटनेने जाहीर केले आहे की, जोपर्यंत मोन जिल्ह्यातील पोलिस कारवाईत ठार झालेल्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते सुरक्षा दलासोबत समन्वयाने वागणार नाहीत. न्याय मिळेल तेव्हाच सहकार्य केले जाईल. या असहकारात कोणत्याही राष्ट्रीय उत्सवापासून अंतर राखणे हेदेखील समाविष्ट आहे. त्यामुळे पूर्व नागालँडमधील लोक २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झालेले नाहीत. ईएनपीओचे अध्यक्ष आर स्पाकीयू संगतम आणि संघटनेचे सरचिटणीस सी मंगलांग फोम यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, १४ डिसेंबर २०२१रोजी लाँगलेंग येथे ईएनपीओची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, नागा स्टुडंट्स फेडरेशननेही (NSF) नागा तरुण आणि विद्यार्थी समुदायाला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. ही संघटना AFSPA लादण्यासही विरोध करत आहे. सरकारला नागा तरुणांचा आवाज दाबायचा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. सोम येथील घटनेबाबत एसआयटीचा अहवाल सार्वजनिक करून दोषींना लवकरात लवकर शिक्षा करावी, असे आवाहनही विद्यार्थी संघटनेने राज्य सरकारला केले आहे.