नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशात सध्या द केरला स्टोरी या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर, अनेक ठिकाणी हा सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या चित्रपटात अनेक अवास्तव बाबी दाखवून धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याची टीकाही होत आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सिनेमा पाहिला. थिएटरमध्ये जाऊन त्यांनी रात्रीच्या सुमारास हा सिनेमा बघितला. त्यानंतर त्यांनी त्यांची प्रतिक्रीया माध्यमांशी बोलताना दिली आहे.
देशामध्ये कशा पद्धतीचे षडयंत्र रचलं जात आहे आणि त्याला अनेक तरुण मुली कशा बळी पडत आहेत याचे चित्रण दाखविणारा हा सिनेमा आहे. यामुळे अनेकांची झोपही उडाली आहे, असे सांगत फडणवीसांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे.
बघा, त्यांची संपूर्ण प्रतिक्रीया
LIVE | Media interaction in #Nagpur https://t.co/opUZ1wxttT
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 9, 2023
माउथ पब्लिसिटीचा चित्रपटाला फायदा
केरळ स्टोरीला माउथ पब्लिसिटीचा मोठा फायदा होत आहे. या चित्रपटाला मिळणार प्रतिसाद पाहता ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ला मागे टाकेल असेच दिसते आहे. केरळ स्टोरीच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन काश्मीर फाईल्सपेक्षा खूपच चांगले होते. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ने सोमवारी १५ कोटींहून अधिक कमाई केली.
चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाला ४ दिवसांत ४६ कोटींहून अधिक कमाई करण्यात यश आले आहे. हा चित्रपट महाराष्ट्र आणि केरळमध्ये चांगला व्यवसाय करत आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट अवघ्या ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. बजेटची ही रक्कम पहिल्या चार दिवसांत वसूल झाली आहे.
काय आहे कथा?
केरळमधल्या तीन मुलींची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तिघींचं आधी ब्रेनवॉश केलं जातं. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं. या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. केरळ हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह असं काहीच न दाखवल्याने कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचं परीक्षण करून त्याला सर्टिफिकेट दिल्याने थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तो योग्य असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इनानी आणि सोनिया बिहानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
The Kerala Story Movie DYCM Devendra Fadnavis