नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इच्छामणी मंगल कार्यालय जवळ असलेल्या उपनगर सिग्नलवर काल रात्रीच्या सुमारात कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. पेट घेतलेल्या या कारमधून सहा जण प्रसंगावधान राखत गाडीतून उतरले. त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, गोविंदनगर येथे पेस अपार्टमेंटमध्ये राहणारे शशी हरी हेमनानी हे वडील हरी हेमनानी व चार मुले यांच्यासोबत भगूर येथे रेणुका मात मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यावेळेस उपनगर नाक्यावर ही दुर्घटना घडली. कारने अचानक पेट घेतल्याचे मागून येणा-या रिक्षाचालकाने सांगितल्यानंतर हेमनानी यांनी कार थांबवली. त्यानंतर त्यांनी परिवारातील सर्वा सदस्यांना गाडीतून उतरवले. त्यामुळे या दुर्घटनेत कारचे नुकसान झाले. पण, प्रसंगावधान राखत सर्वांना बाहेर काढल्यामुळे कोणतीच जीवितहानी झाली नाही.