मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करतानाच महामार्ग, जोड रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलिस, महानगरपालिका बांधकाम या विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून ही काम पूर्ण करावी. या कामांसंदर्भात समन्वयासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि विविध विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज विधानभवनात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोजकुमार सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, ठाणे पोलिस आयुक्त जय जीत सिंह, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पनवेल, भिवंडी, उल्हासनगर महानगरपालिकांचे आयुक्त, ठाणे, रायगड जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
ठाणे शहर आणि परिसरातील मुंब्रा बायपास, घोडबंदर रस्ता ते गायमुख, खारेगाव, साकेत पुलाची दुरुस्ती तसेच नाशिक, अहमदाबाद महामार्गावरील कामे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
ठाणे विभागात विविध पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर शहरातील आणि महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांची आणि पुलांच्या दुरूस्तीची कामे यंत्रणांनी हाती घेतली आहे. याकामांमुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून कामे करावीत. आगामी पावसाळ्यापूर्वी येत्या दोन महिन्यात ही सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत यादृष्टीने कार्यवाही करावी. त्यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पहावे आणि सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय करून वेळेत ही दुरुस्तीची काम पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
जेएनपीटीकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉट करावेत. ट्रॅफिक वॉर्डनची संख्या वाढवावी, अवजड वाहन नादुरुस्त झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी महामार्गावर क्रेन्सची सुविधा वाढवावी, या कामाशी संबंधित यंत्रणांनी आपल्या विभागाचा एक समन्वय अधिकारी नेमावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ठाणे शहरातून जाणारे सर्वीस रोड महामार्गाशी जोडण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
Thane Traffic Vidhan Bhavan Special Meeting