ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहायक आयुक्त महेश आहेर बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडत आसतांना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर यांच्यासह अन्य तिघांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. आहेर यांच्या बचावासाठी उपस्थित सुरक्षारक्षक धावले. त्यातील एकाने बंदूकही बाहेर काढली. तरीही आरोपी त्याचठिकाणी उभे होते. काही वेळानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलिस पालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनंतर पोलिस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ऑडिओ क्लिप ठरली कारणीभूत
जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांनी नौपाडा पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. व्हायरल होणाऱ्या या ऑडिओमध्ये त्यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
आवाज कुणाचा?
संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाचा स्पेनमधील पत्ता शोधला असल्याचा आणि जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या क्लिपने खळबळ उडवून दिली आहे. क्लिपमधील आवाज ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आपण जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार नसल्याचे आहेर यांनी म्हटले आहे.
Thane NCP MLA Jitendra Awhad FIR Booked Crime