रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या पाठोपाठ आता राजापूर मतदार संघाचे आमदार राजन साळवी हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. त्यामुळेच ईडीने साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि भाऊ यांना चौकशीचे समन्स बजावले आहे. या सर्वांना येत्या २० मार्च रोजी हजर राहण्याचे समन्समध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1636235658279768065?s=20
डिसेंबरमध्ये एसीबीकडून चौकशी
रायगड लाचलुचपत विभागाने गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी साळवी यांची साडेचार तास चौकशी केली होती. आता पुन्हा ईडीने समन्स बजावल्याने साळवी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राजन साळवी हे त्यांच्या स्वतः सह कुटुंबाच्या मालमत्तेच्या उघड चौकशीसाठी लाचलुचपत कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांची सुमारे साडेचार तास चौकशी करण्यात आली होती.
पोलिस बंदोबस्तात चौकशी
पोलीसांनी आमदार साळवी यांच्या समवेत त्यांचे बंधु आणि स्विय साहाय्यक या दोघांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात प्रवेश दिला. यापुर्वी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राजन साळवी हे दि. ५ डिसेंबरला चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यानंतर आपण १५ दिवसांनी हजर राहणार असल्याचे आमदार साळवी यांनी या विभागाला कळवले होते. लाचलुचपत विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सुषमा सोनवणे यांनी आमदार साळवी यांची चौकशी केली. साळवी यांच्या चौकशीच्या पार्श्वभुमीवर एसीबी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी शिवसैनिक आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच, कार्यालय परिसरात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
साळवींनी दिली होती ही प्रतिक्रीया
साळवी म्हणाले की, मी अशा कितीही नोटीसा आल्या तरी घाबरणार नाही, माझे काम मी करत राहीन, शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला रडायचे नाही तर लढायचे अशी शिकवण दिली आहे. त्यामुळे अशा नोटीसांचा मला फरक पडणार नाही. या चौकशीला मी ठाम पणे सामोरे जाणार असून, यातून काही निष्पन्न होणार नाही भ्रमाचा भोपळा नक्की फुटेल असा विश्वास आमदार साळवी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी तसेच रायगडच्या शिवसैनिकांचे आभार मानले. त्यानंतर ते रत्नागिरीच्या दिशेने निर्माण झाले.
Thackeray Group MLA Rajan Salvi ED Summons