पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी जुनैद मोहम्मद नावाच्या संशयिताला अटक केली आहे. लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेत युवकांना भरती करण्याचे काम संशयित जुनैद करत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आलेली कारवाई खूपच महत्त्वाची मानली जात आहे. उत्तर प्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रातील युवकांना संशियत जुनैदने दहशतवादी संघटनेत कथितरित्या भरती केले होते.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लष्कर-ए-तय्यबाकडून जम्मू आणि काश्मीरच्या बाहेरील युवकांना संघटनेत भरती केले जात असून, हे प्रकरण म्हणजे लष्कर ए तयब्बाची नवी मोडस ऑपरेंडी असू शकते. यामध्ये सोशल मीडियाचा विशेष वापर केला जात आहे. संघटनेत भरती करण्यात आलेल्या काही युवकांना अटक करण्यात आली आहे. तर एका युवकाचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे. जुनैदला आदेश देणाऱ्या लष्करच्या तीन हँडलर्सचा महाराष्ट्र एटीएसकडून शोध सुरू आहे.
माध्यमांच्या वृत्तांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे, की त्याच्या हँडलर्सनी त्याचे बनावट फेसबुक प्रोफाइल बनवण्याचे, धर्मांध युवकांशी बोलण्याचे, त्यांना भरती करवून घेण्याचे निर्देश दिले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जुनैद युवकांशी संपर्कात होता. तीन जूनपर्यंत जुनैदला एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जुनैद कोण आहे
जुनैद मोहम्मद हा अकोला येथील रहिवासी आहे. तो भंगार गोळा करण्याचे काम करत होता. धर्मांध झाल्यानंतर तो लष्कर-ए-तय्यबाच्या संपर्कात आला होता. संघटनेत त्याचे महत्त्व वाढत गेले आणि धर्मांध युवकांना शोधून त्यांना संघटनेत भरती करण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी तो अकोल्याहून पुण्याला आला होता. महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणी ३० डिसेंबर २०२१ पासून मुक्त तपास सुरू केला होता.
काम करण्याची पद्धत
जुनैदने फेसबुकवर किमान पाच खाते उघडले होते. विशेष म्हणजे त्याने सर्व प्रोफाइलवर स्वतःचा फोटो लावला होता. परंतु सर्व प्रोफाइलची नावे वेगवेगळी होती. धर्मांध युवकांच्या फेसबुक प्रोफाइलचा तो बारीक अभ्यास करत होता. संबंधित युवक खास विचारधारेचा आहे की नाही हे तो शोधायचा. त्यानंतर तो त्यांच्याशी मॅसेंजरवर बोलायचा. भरती केलेल्या युवकांशी संपर्कात राहण्यासाठी तो वेगवेगळे सिमकार्डचा वापर करत होता. त्याच्याकडून जवळपास १० सिमकार्ड जप्त केले आहेत.