इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
उत्तर भारतात छटपूजेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, या धार्मिक विधीप्रसंगी महिलांची पूजेसाठी प्रचंड प्रमाणावर गर्दी होते, बिहारमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात छटपूजे निमित्त जमलेल्या भाविकांच्या कार्यक्रमात गर्दीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ३० जण गंभीर जखमी झाले आहेत.
छठ पूजेचा प्रसाद बनवत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका दुमजली इमारतीला आग लागली. या दरम्यान, माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे गस्ती पथकही तेथे पोहोचले व पोलीस कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. यात ७ पोलिसही भाजले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, औरंगाबाद शहरातील सर्वात अरुंद गल्ल्यांपैकी एक असलेल्या तेली मोहल्लामध्ये ही दुर्घटना घडली असून ओडिया रस्त्यावर शुक्रवार, दि. २८ रोजी रात्री अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे दुमजली इमारतीतील घराला आग लागली. जुन्या जीटी रोडवर असलेल्या मर्फी रेडिओच्या गल्लीत अनिल गोस्वामी नावाच्या व्यक्तीच्या घरी छठपूजेचे आयोजन करण्यात येत होते, तेव्हा शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या घरी महिला छठ सणासाठी प्रसाद बनवत होत्या.