मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांनी गोड्या पाण्यात अधिवास करणार्या माशांच्या कुळातील ईल या प्रजातीचा शोध लावला आहे. मुंबईतील एका विहिरीत जीनस रक्थमिच्थिसशी निगडित ब्लाइंड स्वॅम्प ईल या प्रजातीचा शोध लावला आहे. या संशोधनात तेजस ठाकरे आणि त्यांचे तीन मित्र प्रवीण राज जयसिंहन, अनिल महापात्रा आणि अन्नम पवन कुमार यांचा समावेश होता.
नव्या प्रजातीचे नाव मुंबईच्या नावावरून मुंबा ब्लाइंड ईल असे ठेवण्यात आले आहे. तेजस आणि त्याच्या तीन सहकार्यांचे संशोधन अॅक्वा इंटरनॅशनल जर्नल ऑफ इचिथोलॉजी या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. या संशोधनपत्रिकेत माशांवरील संशोधन प्रकाशित केले जाते. तेजस यांनी काही वर्षांपूर्वी या प्रजातीवर संशोधन केले होते. कोविड महामारीदरम्यान यावर बरेच संशोधन झाले. सापासारखा दिसणारा हा प्राणी माशांच्या श्रेणीत येतो. तो अंध असतो. पश्चिम घाटात हा प्राणी आढळला आहे. त्यामुळे त्याचे नाव मुंबा असे नाव देण्यात आले आहे.
तेजस ठाकरे यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर सांगितले की, “काही वर्षांपूर्वी शोध लावलेल्या एका प्रजातीचा परिचय करून देताना आनंद होत आहे. कोरोना महामारीदरम्यान या प्रजातीवर बरेच संशोधन झाले आहे. यादरम्यान अनेक चढ-उतार आले. आज अखेर या दिवसाचा प्रकाश पाहण्याची संधी या प्राण्याला मिळाली आहे. सादर करत आहे, रक्थमिच्टिस मुंबा द मुंबई ब्लाइंड ईलची नवी प्रजाती ब्लाइंड हायपोजीन फ्रेशवॉटर ईल.”
तेजस ठाकरेचे मोठे भाऊ आदित्य ठाकरे सध्या राज्याचे पर्यावरणमंत्री आहेत. आदित्य हेसुद्धा पर्यावरण विषयावर संवेदनशील आहेत. या दोघांचे वडील आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हवाई आणि वन्यजीवांच्या छायाचित्रणाची आवड आहे.