मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘टेक्निकल टेक्सटाईल पार्क’ धाराशिव येथे उभारण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत समिती गठित करण्यात येईल. या समितीचा अहवाल 30 दिवसात मागविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य राणा जगजीत सिंह पाटील यांनी धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाइल पार्क स्थापना करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, धाराशिव येथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून के.पी.एम.जी. या संस्थेमार्फत प्राथमिक व्यवहार्यतेबाबत पडताळणी करून प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, प्रकाश सोळंके यांनी सहभाग घेतला.
छत्रपती संभाजीनगर येथील ‘वाळूज’ प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात येणार
छत्रपती संभाजीनगरातील वाळूज प्रकल्पाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेले दावे, इतर बाबी विचारात घेऊन सर्वंकष निर्णय घेण्याची शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकल्पासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य शांताराम मोरे यांनी वाळूज प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, वाळूज महानगर प्रकल्पाच्या मंजूर धोरणानुसार जमीन मालकाचा प्रत्यक्ष प्रकल्पात सहभाग या संकल्पनेवर प्रत्येक महानगरातील विकास केंद्राकरिता 100% भूसंपादन प्रस्तावित आहे. विकास केंद्राबाहेर २५ टक्के संपादन करावयाचे असून उर्वरित 75 टक्के क्षेत्राचा विकास जमीन मालकाने करावयाचा आहे. भूधारकांकडील 75 टक्के जमिनीवरील विकास करण्यास सिडकोकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रकाश सोळंके, प्रशांत बंब, सीमा हिरे यांनी सहभाग घेतला.
Technical Textile Park Will be Set up in This City