नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेतन पथक अधिक्षक उदय देवरे यांची नाशिक जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात यावी यासह माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा टीडीएफने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात नोकरी करत असताना देवरे यांनी भ्रष्टाचार करून गैरमार्गाने करोडो रुपयांची संपत्ती जमा केली आहे. म्हणून वरील सर्व बाबींची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच सीआयडीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी. देवरे यांच्यावर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. कोरोनाचे निर्बंध पाळत या उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.
टीडीएफने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी उपयोजन भागातील काही शाळांचे तसेच अनेक माध्यमिक शाळांचे दुसर्या व तिसर्या टप्प्यातील पगार गेल्या अनेक वर्षापासून दोन ते तीन महिने उशिराने होतात. माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफच्या काही पदाधिकाऱ्यांनी, जिजामाता माध्यमिक विद्यालय (दहिवड, ता. देवळा) शाळेला सदिच्छा भेट दिली. या शाळेतील काही कर्मचाऱ्यांचे दोन-तीन महिन्यांपासून पगारच झालेले नव्हते. या कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वेतन पथक कार्यालयातील काही दलाल वेतन काढण्यासाठी आमच्याकडे पैसे मागत असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.
टीडीएफने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांच्या तक्रारीनंतर यासंदर्भात वेतन पथक अधीक्षक उदय देवरे यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी फोनद्वारे संपर्क साधला असता देवरे यांनी फोनवरच भांडण करायला सुरुवात केली. ते हरामखोर शिक्षक खोटे बोलतात असा आरोपही त्यांनी केला. देवरे यांनी हरामखोर असा शब्द वापरून जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षक समाजाचा उपमर्द करून शिक्षकांना कमी लेखण्याचा तसेच अपमान केला आहे. देवरे हे वेतन पथक कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांशी अतिशय उद्धटपणे व बेतालपणे वागतात, मग्रुरीची भाषा वापरतात. संपूर्ण जिल्हाभरातील मुख्याध्यापक, लिपिक व शिक्षकांच्या त्यांच्याबद्दल अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत. तसेच ते गेल्या अनेक वर्षापासून नाशिक जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले आहेत. आपला मंत्रालयात वशिला असल्याच्या वल्गनाही ते करतात. शिक्षणाधिकारी कार्यालयातील दप्तर दिरंगाई, दलालांचा सुळसुळाट, किरकोळ कामासाठी जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांना वारंवार चकरा मारायला लावणे,आदी आमच्या खालील मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून आम्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आमरण उपोषण सुरू केले आहे. यापुढील सर्व परिणामांना शिक्षणाधिकारी कार्यालय जबाबदार राहील, असा इशारा टीडीएफने दिला आहे.
संघटनेच्या मागण्या अशा
1) वेतन पथक अधीक्षक श्री.उदय देवरे यांची तात्काळ नाशिक जिल्ह्यातून बदली करण्यात यावी.
2) विधायक कार्य समिती, सटाणा येथील 39 कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू करण्यात यावे,तसेच या संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत.
3) 1 एप्रिल 2018 पासून वेतन पथक कार्यालयाची खास पथकामार्फत पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी.
4) सातव्या वेतन आयोगासह,वरिष्ठ श्रेणी, निवडश्रेणी,इन्क्रिमेंट सेवा पुस्तकाची दुसरी प्रत शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना दिलेली आहे,याबाबत मार्च महिन्याचे वेतन बिल स्वीकारताना मुख्याध्यापकांचे हमीपत्र घेण्यात यावे.
5) सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 6 महिने आधी सेवानिवृत्तीचा प्रस्ताव न पाठवणाऱ्या संस्थांवर, मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी.
6) जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना पीएफच्या स्लिपा तसेच एनपीएस खात्याचा हिशेब देण्यात यावा.
7) नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात नोकरी करत असताना देवरे यांनी भ्रष्टाचार करून गैरमार्गाने करोडो रुपयांची संपत्ती जमा केली आहे. म्हणून वरील सर्व बाबींची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच सीआयडीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी. देवरे यांच्यावर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी.