गुरूवार, ऑक्टोबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिक्षकदिन: शिक्षकांच्या व्यथा आणि समाजाचा दृष्टीकोन

सप्टेंबर 5, 2021 | 8:21 am
in इतर
0
teacher day

संगीता महाजन
अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच शिक्षण ही मानवाची चौथी मुलभूत गरज बनली आहे. पूर्वीच्या काळी आश्रमात, गुरुगृही दिले जाणारे शिक्षणाचे स्वरूप बदलून आता ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत येऊन पोहोचले आहे. मध्यंतरीच्या काळात शिक्षण क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे झाली, अनेक बदल झाले. मात्र विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय कायम राहिले. बदलत्या काळानुरूप विविध आव्हाने स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्षम बनविण्याची शिक्षकांची जबाबदारी निश्चितच वाढलीय. या बदलत्या परिस्थिती बरोबर आजचा शिक्षकही स्वतःच्या ज्ञानात भर घालून अद्ययावत राहण्याचा प्रयत्न करतोय. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने पेलून स्वतःमध्ये बदल घडवून आणतोय. विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनविण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय.

मात्र दिवसेंदिवस शिक्षकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत चालला आहे हेही तितकेच खरे. पूर्वीच्या काळी शिक्षकांबद्दल दिसणारा आदरभाव, शिक्षकांना दिली जाणारी सन्मानपूर्वक वागणूक दिवसेंदिवस कमी होत चाललीय. आधुनिकीकरणाचे वारे जसजसे वाहू लागले तसतसे शिक्षकांच्या राहणीमानात फरक पडला. गुरुजींच्या पायजमा, धोतराची जागा सरांच्या जीन्स, टी-शर्ट ने घेतली, बाईंच्या साडी ऐवजी मॅडम पंजाबी ड्रेस मध्ये दिसू लागल्या. गुरुजींची सायकल जाऊन तिची जागा दुचाकी-चारचाकी ने घेतली आणि समाजाच्या नजरा बदलल्या.मला वाटते हा बदल फक्त शिक्षकी पेशातच झाला नाही तर इतरही सर्व क्षेत्रात झाला. साऱ्यांचेच राहणीमान बदलले, मग शिक्षकच का सर्वांच्या नजरेत आला? जरा कुठे कुटुंबासोबत शिक्षक सुट्टीच्या कालावधीत फिरायला गेला की चर्चेला सुरुवात होते. असे का? शिक्षकही शेवटी माणूसच आहे ना! मग काढला कुटुंबासाठी थोडा वेळ तर बिघडले कुठे? पण नाही जरा कुठे खट्ट झाले की शिक्षकांच्या पगारावर बोट ठेवले जाते. इतर क्षेत्रातील लाखोने पॅकेज घेणाऱ्यांचे कोणाला देणे – घेणे नसते. असो!

शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललाय,विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरलीय असा सर्रास आरोप करून शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. मात्र असे आरोप करतांना शिक्षकांना त्यांच्या ज्ञानदानाच्या कामापासून काहीसे दूर नेणाऱ्या व्यवस्थेकडे डोळेझाक केली जाते. वर्गात अध्यापन करण्यासाठी जरा कुठे हातात खडू घेऊन शिकवायला सुरुवात केली की लगेच एखादा कागद टेबलावर येऊन धडकतो आणि अर्जंट माहिती च्या नावाखाली हातातील खडू बाजूला पडतो. दिवसभरात असे कितीतरी अर्जंट कागद एकामागोमाग एक चालूच असतात. या कागदांच्या ओझ्याखाली आजचा शिक्षक दबला गेलाय. घरून कितीही नियोजन करून वर्गात गेले तरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताच येत नाही. आकडेवारी, सांख्यिकी माहिती, विविध शासकीय योजनांच्या फाइल्स, पोषण आहार नोंदी आणि अजून काय काय….. कागदी घोडे नाचविण्यातच अख्खा दिवस वाया जातो. तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण क्षेत्रात सुरू झाल्यानंतर हा कागदांचा खेळ कुठेतरी थांबेल असे वाटत होते पण नाही! आता तर कोणतीही माहिती द्यायची झाली तर ती दोन प्रकारे मागवली जाते, एक हार्ड कॉपी आणि एक सॉफ्ट कॉपी. माहितीचे संगणकीकरण होत असतांना कागदांपासून सुटका मिळणे अपेक्षित होते मात्र तसे न होता काम अजूनच वाढलेय. विद्यार्थ्यांचा वर्गशिक्षक,विद्यार्थ्याचा पालक या भूमिका बजावतांनाच स्वयंपाकी, डॉक्टर, कारकून, मदतनीस, सफाई कामगार अशा विविध भूमिका शिक्षकाला कराव्या लागतात. तसेच कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण असेल तर तिथे शिक्षक हवाच! स्मार्ट ग्राम योजना, हागणदारीमुक्त गाव, संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम, शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण, निर्मल ग्राम योजना अशा प्रत्येक ठिकाणी शिक्षक जातीने हजर पाहिजे. शिक्षकाने सर्वतोपरी योगदान दिलेच पाहिजे, मात्र हाच शिक्षक स्मार्ट ग्राम पुरस्कार घेतांना किंवा तंटामुक्त गाव पुरस्कार घेतांना दुर्लक्षिला जातो. ‘ओन्ली युज अँड थ्रो’ अशी त्याची अवस्था असते.

‘नवी विटी, नवे राज्य’ या उक्तीप्रमाणे नवीन अधिकारी आले की नवीन उपक्रम सुरु होतो. स्वतःचे काम दाखविण्यासाठी प्रत्येक अधिकारी डोक्यातून येणाऱ्या सुपीक कल्पना शिक्षकांवर लादतात. पुन्हा खेळ सुरू होतो आकडेवारीचा. मग प्रत्येक महिन्याला त्या उपक्रमाच्या चाचण्या, विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती, त्यांच्या नोंदी, गुणनिर्देशक तक्ता आणि वर्षअखेरपर्यंत चढत जाणारा गुणवत्तेचा आलेख. मग तो आलेख खरंच उंचावत गेला की उंचावला गेला हे त्या शिक्षकालाच ठाऊक असते. बरं एकावेळी एक उपक्रम चालेल तर शप्पथ! कारण राज्यस्तरापासून तर पंचायत समितीपर्यंत अनेक अधिकाऱ्यांचे विविध उपक्रम वर्षभर चालूच असतात आणि स्वतःच्या विद्यार्थ्यांची कुवत लक्षात घेऊन शिक्षकाने ठरविलेले स्वतःचे उपक्रम बासनात गुंडाळले जातात. कसा उंचावणार शैक्षणिक दर्जा? त्यात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत नापास न करण्याचे आरटीई अंतर्गत आलेले नवीन शैक्षणिक धोरण. मागील वर्षीच्या क्षमता अप्राप्त असूनही विद्यार्थी पुढील वर्गात ढकलायचे. पुढच्या वर्गात त्या अप्राप्त क्षमता विद्यार्थ्याला प्राप्त करून द्यायच्या हे बोलायला सोपे वाटत असले तरी ते तितकेसे सोपे नसते, कारण प्रत्येक विषयाच्या क्षमता भिन्नभिन्न असतात. त्यात विद्यार्थ्यांचे गट करायचे ठरवले तरी प्रत्येक विद्यार्थ्याचा विषय आणि क्षमतेनुरूप स्वतंत्र गट होईल अशी परिस्थिती. मग कशी दिसेल गुणवत्ता? त्यात भरीस भर म्हणजे शिक्षकांमधील विशिष्ट गूण हेरून अशा शिक्षकांचा स्वतःच्या सोईने वरिष्ठांमार्फत केला जाणारा वापर! हल्ली तर तंत्रस्नेही शिक्षक त्यांच्या वर्गात कमी आणि ऑफिस मध्ये जास्त दिसतात. मग आख्ख्या तालुक्याच्या माहितीचे एकत्रीकरण करत असताना त्या शिक्षकाच्या वर्गातील मुलांचे काय होत असेल याचा कुणीच विचार करत नाही. निवडणूक कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून शिक्षक कामकाज करतात. त्यात प्रशिक्षणाचे दोन-तीन दिवस आणि प्रत्यक्ष निवडणुकीचे दोन दिवस काम करायला सर्वच शिक्षकांची तयारी असते मात्र काही शिक्षकांना सर्रासपणे डाटा ऑपरेटर चे काम देऊन महिनाभर निवडणूक कामात गुंतवले जाते, मग त्या शिक्षकाच्या वर्गावर काही पर्यायी व्यवस्था का केली जात नाही? त्या शिक्षकाचा जीव विद्यार्थ्यांसाठी कितीही तुटत असला तरी कारवाईचा बडगा नको म्हणून तो गुपचुप दिलेले काम करतो येथे चूक कोणाची?

“आमच्या वेळी खूप शिस्त होती, आम्हाला गुरुजींचा खूप धाक होता”, असे पालक सहज येऊन बोलून जातात; मात्र तेव्हाच्या गुरुजींच्या हातात दिसणारी छडीच आता लुप्त झालीय तर धाक येणार कुठून? छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! या ओळी कधीच कालबाह्य झाल्या. कारण विद्यार्थ्यांसाठी छडीचा वापर करायचा नाही असे नवीन धोरण सांगते, मग कशी लावणार विद्यार्थ्यांना शिस्त? शिक्षा तर करायची मात्र तिचे स्वरूप बदलले. विद्यार्थ्यांना सकारात्मक शिक्षा करायची. त्यासाठी शिक्षा म्हणून शाळेच्या आवारातील झाडांना पाणी देणे,मैदान स्वच्छ करून घेणे, वर्ग सफाई करणे ही कामे सांगायची आणि ही कामे विद्यार्थ्यांना एवढे आवडतात की त्यात त्यांना शिक्षा न वाटता ते बक्षीस वाटते आणि पुन्हा पुन्हा त्याच चुका ते करतात कशी होणार सुधारणा? थोडे मुलांना रागावले की दुसऱ्या दिवशी पालक शाळेत हजर! अभ्यासाची चौकशी नाही करणार, पण रागावल्याचा जाब नक्की विचारणार. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी शिक्षकांची अवस्था झालीय. कोरोना काळात तर ‘घरी बसून शिक्षक फुकटचा पगार घेताय’, असे सर्रासपणे बोलले जातेय. पण या काळात शिक्षकाने केलेली कामे नजरेआड केली जाताय. शाळा चालू असतांना दहा ते पाच या वेळेत ड्युटीवर असणारा शिक्षक कोरोना काळात अर्ध्या रात्री चेक पोस्टवर, कोविड सेंटरवर ड्युटी करत होता. घरोघरी जाऊन कोरोना सर्वेक्षण करत होता. गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्याजवळ जायला जेथे त्यांचे नातेवाईकही घाबरत होते तेथे मात्र शिक्षक दररोज अशा रुग्णांचे तापमान, ऑक्सिजन मोजत होता. त्यांच्या घरातील इतर व्यक्तींमध्ये काही लक्षणे आढळतात का याची नोंद घेत होता. रेशन दुकानात धान्य वाटप करत होता, तर कुठे सेवाभावी संस्थांमार्फत मदत करत होता, आणि हो! हे करत असतांनाच या ना त्या मार्गाने ज्ञानदानाचे कामही चालूच होते. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुस्तक वाटप करणे, गृहभेटी घेणे, छोटे गट करून मार्गदर्शन करणे, गल्ली मित्र, ओट्यावरची शाळा अशा विविध मार्गाने ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होता. शाळा चालू असतांना कराव्या लागणाऱ्या कामापेक्षा कितीतरी पट अधिक काम या काळात शिक्षक करतोय. मात्र काही उपटसुंभ, ‘फुकटचा पगार घेणारे’ म्हणून शिक्षकांची अवहेलना करत आहे! शाळा सुरू व्हाव्यात असे आज प्रत्येक शिक्षकाला मनापासून वाटतेय, कारण विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान शिक्षकांनाही नको आहे पण नैसर्गिक संकटापुढे तोही हतबल झालाय! अशा परिस्थितीत कोरोना योद्ध्यांना जो सन्मान मिळतोय तो शिक्षकाला का मिळू नये? काही तुरळक अपवाद वगळता कोरोना योद्धा म्हणूनही शिक्षक दुर्लक्षितच राहिला!

अगदी तन-मन-धनाने, प्रामाणिकपणे काम करणारा शिक्षक आजही खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांवर पाहायला मिळतो. अशा शिक्षकांना ना कौतुकाची अपेक्षा असते,ना आदर्श शिक्षक पुरस्काराची! आपला विद्यार्थी हाच त्यांच्यासाठी देव असतो आणि विद्यार्थ्यांचा विकास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय असते. पण असे कर्तव्यनिष्ठ शिक्षक सेवानिवृत्त झाले तरी उपेक्षितच राहतात! मी कोणी शिक्षणतज्ञ वगैरे नाही पण गेल्या वीस वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत असतांना ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या त्या मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करतेय.माझी सर्वच मते सर्वांना पटतीलच असेही नाही. पण खरोखर आपलेही काही चुकतेय का?समाजाचा हा दृष्टीकोन बदलण्यास आपणही कारणीभूत नाही ना? याचा विचारही शिक्षकांनी करायला हवा. आज दोन – चार टक्के शिक्षक असेही आहेत ज्यांना आपल्या जबाबदारीचे भान नाही, ना कसली पर्वा! आपल्या एखाद्या छोट्याशा कृतीमुळे, चुकीमुळे आख्ख्या शिक्षकी पेशा जर बदनाम होत असेल तर नक्कीच सुधारण्याची गरज आहे. अशा बोटावर मोजण्याइतक्या अपप्रवृत्ती मुळे समाज जर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेकडे बोट दाखवत असेल तर अशाअपप्रवृत्तींनी लवकरच भानावर यायला हवे. वरिष्ठांची मर्जी राखण्याच्या नादात आपण आपल्या मूळ कर्तव्यापासून दूर तर जात नाही ना याचेही आत्मपरीक्षण करणे गरजेचेअसो! शिक्षक व समाज हे शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. या दोघांमध्येही थोडेफार अजून सकारात्मक बदल घडून उद्याची भावी पिढी सक्षम होण्यासाठी दोन्ही घटकांनी पुरेपूर योगदान द्यावे हीच एक अपेक्षा! शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक बंधू- भगिनींना हार्दिक शुभेच्छा!!!
संगीता महाजन – ९१५६३१०९०७

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तालिबानबाबत पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा हा घ्या खणखणीत पुरावा

Next Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ९५८; महानगरपालिका क्षेत्रात ४८९, पंधरा तालुक्यात ४५८ रुग्ण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

MOBILE
मुख्य बातमी

दिव्यांगांसाठी खुषखबर… हे ॲप डाऊनलोड करा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या…

ऑक्टोबर 15, 2025
Rural Hospital PHC 1
महत्त्वाच्या बातम्या

अजूनही कुटुंब जिवंत आहे… लहान भावाने वाचवले मोठ्या भावाचे प्राण…

ऑक्टोबर 15, 2025
IMG 20251015 WA0053
महत्त्वाच्या बातम्या

सिंहस्थ कामांचा शुभारंभ… या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त…

ऑक्टोबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

असा असेल तुमचा १६ ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या गुरुवारचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 15, 2025
maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
Next Post
carona 1

नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ९५८; महानगरपालिका क्षेत्रात ४८९, पंधरा तालुक्यात ४५८ रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011