मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इलेक्ट्रिक कारला आग लागण्याची भारतातील पहिली घटना समोर आली आहे. टाटाची लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी SUV Tata Nexon मध्ये ही आग लागली आहे. ही घटना 22 जून रोजी रात्री घडली आहे. वसई पश्चिम येथील पंचवटी हॉटेलजवळ नेक्सॉन कारला आग लागल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिपोर्ट्सनुसार, कारच्या मालकाने त्याच्या नेक्सॉन ईव्हीला त्याच्या ऑफिसमध्ये नेहमीच्या स्लो चार्जरने चार्ज केले. ऑफिसमधून तो रात्रीच्या सुमारास घरी निघाला. त्याने साधारण ५ किमी अंतर कापले. त्यानंतर कारमधून विचित्र आवाज त्याला ऐकू आला. त्याचक्षणी कारच्या डॅशबोर्डवर इशारा देणारे चिन्ह त्याला दिसले. तातडीने वाहन थांबवावे आणि कारमधून बाहेर पडावे असा इशारा त्या चिन्हाने दिला. त्यानंतर कार मालक कारच्या बाहेर आला. त्याचवेळी कारने पेट घेतला. आग आटोक्यात आणण्यासाठी नंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
टाटा मोटर्सने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. कंपनीने सांगितले की, मुंबईतील नेक्सॉन इलेक्ट्रिक वाहन (EV) मध्ये नुकत्याच झालेल्या आगीच्या घटनेचा तपास करत आहे. आमची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच आम्ही यासंदर्भात सविस्तर माहिती देऊ. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक वाहन आगीच्या घटनेचे व्यापक शेअरिंग दरम्यान कंपनीने हे विधान जारी केले.
https://twitter.com/KamalJoshi108/status/1539614826955214849?s=20&t=pxhnbdnCZUS2S5QR1JfTIw
आम्ही आमच्या वाहनांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. सुमारे चार वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या कालावधीत, 30,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांनी एकत्रितपणे देशभरात 10 लाख किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे.
गेल्या काही दिवसांत दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा ऑटोटेक आणि प्युअर ईव्ही सारख्या अनेक इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांनी या घटनांमुळे त्यांची मध्यवर्ती वाहने परत मागवली आहेत. या घटनांच्या चौकशीसाठी सरकारने एक समितीही स्थापन केली आहे. यासोबतच वाहन उत्पादकांना निष्काळजीपणासाठी शिक्षेचा इशाराही देण्यात आला आहे.
automobile tata nexon electric car catches fire mumbai company says