मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या होतकरू तरुणांसाठी एअर इंडियाने आता रोजगाराचा टेक-ऑफ जाहीर केला आहे. अर्थात त्यासाठी विमान वाहतुकीसाठी आवश्यक असलेले शिक्षण अनिवार्य असणार आहे. कारण एअर इंडिया वैमानिक आणि कॅबिन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
खरं तर टाटा उद्योग समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यापासून मोठ्या प्रमाणात भरती केली आहे. गेल्यावर्षी मार्चपासून आतापर्यंत कंपनीने १९०० केबीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. यातील ५०० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ते आता सेवेतही दाखल झाले आहेत. इतर कर्मचाऱ्यांचे गेल्या सात महिन्यांपासून प्रशिक्षण सुरू आहे. अलीकडेच एअर इंडियाने ४७० नव्या विमानांची खरेदी करणार असल्याची घोषणा केली. त्यासोबत ३६ नवी विमाने भाड्याने घेणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. तर दोन विमाने कंपनीच्या सेवेत दाखलही झाली आहेत.
मेगा भरतीचा प्लान
एअर इंडियाने नव्या विमानांच्या खरेदीसोबतच मेगा भरतीचा प्लान जाहीर केला. यात ९०० वैमानिक आणि ४ हजार २०० केबीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. देशात मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातील नोकरीसाठी तरुण तयारी करीत आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.
नव्या मार्गांवर सेवा
नवीन विमाने एअर इंडियाकडे आली की त्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्या मार्गांवरील विमानसेवा सुरू करण्याची योजना कंपनीने तयार केली आहे. त्यासाठीच नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्लान कंपनीने जाहीर केला आहे. मुख्य म्हणजे देशाच्या सर्व भागांमधून ही भरती करण्याची तयारी कंपनीने केली आहे.
१५ आठवड्यांचे प्रशिक्षण
एअर इंडियाच्या नव्या मेगा भरतीमधून ज्यांची नोकरीसाठी निवड होईल त्यांना १५ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुरक्षा आणि सेवा कौशल्याचे हे प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये थेअरी आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे.
Tata Air India Employment Big Recruitment Soon