इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत आणि पाकिस्तान मध्ये होणारे सामने नेहमीच रोमांचक होतात, असा यापूर्वीचा इतिहास सांगतो. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर चार विकेट्स राखून चित्तथरारक विजय मिळविला. विश्वचषक विजयासाठी भारताच्या मार्गातील एक अडथळा या विजयाने दूर झाला आहे. मात्र, आता पुढचे चित्र कसे आहे, भारत सेमी फायनल पर्यंत पोहचणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संघापुढे आता कोणती आव्हाने आणि अडथळे आहेत ते जाणून घेणे आवश्यक आहे.
खरे म्हणजे भारतीय खेळाडूंसाठी पाकिस्तान विरुद्धचा कोणताही सामना जिंकणे जणू काही आव्हानच असते, काही वेळा तर ‘ करो या मरो ‘ अशी घोषणा देऊन हे सामने खेळले गेले आहेत. त्यामुळे सामना जिंकणे ही जणू काही प्रत्येक खेळाडूची कसोटी ठरते. पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकल्यावर संपूर्ण भारतात प्रचंड जल्लोष केला जातो, परंतु सामना हरला तर मात्र चांगलेच नाच्चकी होते, त्यामुळे कॅप्टन असो की, अन्य कोणतेही खेळाडू त्यांच्यावर खेळाचे मोठे दडपण असते. इतकेच नव्हे तर व्यवस्थापकासह सामन्याशी संबंधित सर्वांवरच या संदर्भात तणाव असतो. परंतु आता भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना काही प्रमाणात दडपण कमी झाले आहे.
अन्य संघांशी खेळताना फारसा तणाव आता जाणवणार नाही, असे म्हटले जाते. तसेच एकूणच या सामन्यात सरशी झाल्याने खेळाडूंसाठी हा सामना मानसिक दडपण दूर करणारा ठरतो. सहाजिकच मैदानावर खेळाडूच्या खेळ कौशल्याबरोबर मानसिकता सर्वांत महत्त्वाची असते. भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यातील खेळावरून येते, भारतीय खेळाडूंनी उच्च दर्जाची मानसिकता दाखवली अन् प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. खेळाडूंच्या मनावरचे व त्याहीपेक्षा क्रिकेट प्रेमींच्या अपेक्षांचे दडपण कमी झाल्याची भावना प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर दिसत होती. आता भारतीय संघ अधिक दडपणमुक्त व मोकळेपणाने उर्वरित सामन्यात खेळतील कारण एक मोठा अडथळा पार झाला, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून जागतिक क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे. मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या T20 विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांचा जुना विश्वविक्रम मोडीत काढला. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विजयांसाठी भारताने आता ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे आणि जागतिक विक्रम केला आहे.
आता भारतीय संघाच्या यंदाच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर त्याने चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाने एकामागून एक अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. भारतीय संघाने वर्षाची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकून केली. यानंतर, त्यांनी घरच्या मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला आणि T20 मालिका ३-० ने जिंकली तर कसोटी मालिका २-० ने जिंकली. त्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत पोहोचून पाच सामन्यांची टी-20 मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
महत्त्वाचे म्हणजे सातत्य राखण्याचे आव्हान प्रत्येकासमोर असते. भारतीय संघ याला अपवाद नाही. त्यामुळे विराट कोहली, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग अशा प्रत्येक खेळाडूला आपल्या खेळात सातत्य राखावे लागणार आहे.
अखेरची पाच षटके जो संघ अचूक टाकेल विजय त्याचाच असेल यात शंका नाही. गेल्या काही सामन्यांत हीच उत्तरार्धातील पाच षटके भारतासाठी आव्हानात्मक ठरली आहेत. कधी भुवनेश्वर, तर कधी अर्शदीप यांना यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे आता विश्वचषक स्पर्धेत या गोलंदाजांना या टप्प्यात छोटीशीही चूक माफ नसेल. एखादा दुबळा संघही याचा फायदा उठवू शकतो. नामिबियाने प्राथमिक फेरीत श्रीलंकेला हरवून हे दाखवून दिले आहे. उत्तरार्धातील षटके भारतीय गोलंदाजांना अचूकच टाकावी लागतील. आता स्पर्धेत नेदरलॅंडस, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांविरुद्धचे भारताचे सामने शिल्लक आहेत. यात दक्षिण आफ्रिका वगळता अन्य कुठलाही संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे क्रिकेट खेळत नाहीत. याला बांगलादेश अपवाद. मात्र बांगलादेश खेळाडू सातत्याच्या अभावामुळे त्रस्त आहेत. दक्षिण आफ्रिका संघाला यापूर्वी मायदेशात झालेल्या मालिकेत भारताने हरवले आहे.
T20 World Cup Indian Cricket Team Performance Semi Final