इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधील एका श्रीमंत हिरे व्यापाऱ्याच्या आठ वर्षांच्या मुलीने साध्वी बनण्यासाठी विलासी जीवन सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. हजारो लोकांच्या उपस्थितीत आज, बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून तिची दीक्षा सुरू झाली आहे. देवांशी जैनाचार्य कीर्तियसूरीश्वर महाराज यांच्याकडून ती दीक्षा घेत आहे. देवांशी दोन बहिणींमध्ये मोठी आहे. खेळण्याच्या आणि उड्या मारण्याच्या वयात देवांशी जैन धर्माचा अंगीकार करून संन्यासी होत आहे.
उंट, हत्ती, घोड्यांची भव्य मिरवणूक
दीक्षा घेण्याच्या एक दिवस आधी शहरात उंट, हत्ती, घोडे आणि मोठ्या थाटामाटात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तिच्या कुटुंबाने यापूर्वी बेल्जियममध्ये अशीच मिरवणूक काढली होती. तेथे जैन समाजातील अनेक हिरे व्यापाऱ्यांचे घर आहे. लहानपणापासून देवांशीने तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे साधे जीवन जगले, दिवसातून तीन वेळा प्रार्थना केली.
टीव्ही, चित्रपट पाहिलेला नाही
देवांशीने कधीही टीव्ही किंवा चित्रपट पाहिलेला नाही आणि रेस्टॉरंट किंवा विवाह सोहळ्यांना कधीही हजेरी लावली नाही. तिने आतापर्यंत 367 दीक्षा कार्यक्रमात भाग घेतला आहे, असे संघवी यांच्या एका कौटुंबिक मित्राने सांगितले. इव्हेंटच्या जवळ असलेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितले की, हिऱ्यांचा मोठा व्यवसाय असूनही, कुटुंब साधे जीवन जगते.
असे आहे कुटुंब
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देवांशी ही धनेश संघवी आणि त्यांची पत्नी अमी यांची मोठी मुलगी आहे. त्यांचे कुटुंब संघवी अँड सन्स नावाची हिरे कंपनी चालवते, जी जगातील सर्वात जुन्या हिरे कंपन्यांपैकी एक आहे. प्रौढ झाल्यावर देवांशीला वारसा हक्काने करोडोचा हिऱ्यांचा व्यवसाय मिळाला असता. पण त्याऐवजी आठ वर्षांच्या देवांशीने बुधवारी सुरतमध्ये ऐषारामाचा त्याग करून संन्यास घेतला.
Surat 8 Year Old Girl Devanshi became a monk
Jain Community Sanghavi Family