नवी दिल्ली – परदेशात आयोजित करण्यात येणार्या परिसंवादात सहभाग घेण्यासाठी देशातील डॉक्टर नेहमीच जात असतात. त्याला वैद्यकीय निष्काळजीपणा असे आपण म्हणू शकत नाही. एका प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. डॉक्टरांना आपल्या क्षेत्रातील नवीन माहिती जाणून घेण्यासाठी स्वतःला अपडेट करावे लागते. त्यासाठी त्यांना देश-परदेशातील संमेलनांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणे आवश्यक असते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
बॉम्बे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर आणि डॉक्टरने एका मृताच्या कायदेशीर वारसांना १४.१८ लाख रुपये व्याजासह अदा करावे असे निर्देश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले होते. या आदेशाविरोधात डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि व्ही. रामसुब्रमण्यन यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाच्या एका आदेशाला रद्द केले. खंडपीठ म्हणाले, परदेशात आयोजित एका संमेलनात सहभागी होण्यासाठी डॉक्टरांना जावे लागले. त्याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हटले जाऊ शकत नाही.
न्यायालय म्हणाले, प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूला वैद्यकीय निष्काळजीपणा कारणीभूत ठरू शकत नाही. डॉक्टर परदेशात गेले होते, म्हणून त्याला निष्काळजीपणा म्हटले जाऊ शकत नाही. रुग्ण ज्या रुग्णालयात दाखल होता, तिथे विविध आजारांचे अनेक तज्ज्ञ असतात. डॉक्टरांनी अमेरिका आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी अनेक दिवस रुग्णाला पाहिलेच नाही किंवा त्याच्यावर उपचार केलेच नाहीत, हे आयोगाचे म्हणणे एक प्रतिकूल टिप्पणी आहे. खंडपीठ म्हणाले, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच रुग्ण गंभीर स्थितीत होता. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा मृत्यू झाला असेल, तर तो डॉक्टरांचा निष्काळजीपणा ठरू शकत नाही. याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हटले जाऊ शकत नाही.