नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेमविवाहातच सर्वाधिक घटस्फोट घडत असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाने पुन्हा एकदा भारतीय विवाहसंस्थेवरील चर्चा सुरू झाली आहे.
प्रेमविवाह करा की घरच्यांच्या संमतीने लग्न करावे, हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. काही जण पारंपरिक पद्धतीने लग्न करून स्वत:चा संसार सुरू करतात. तर काही नेहमीचा मार्ग नाकारत प्रेमविवाहाला पसंती देतात. लग्न कशाही पद्धतीने केले तरी भांड्याला भांडे लागणे, रुसवे-फुगवे, भांडण-तंटा आणि एकमेकांना समजून घेणे या गोष्टी संसारात घडत असतात. बरेचदा लहानसहान वाददेखील विकोपाला जातात आणि संसार मोडकळीस येतो.
घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये प्रेमविवाह तसेच पारंपरिक विवाह करणारे, आ दोहोचांही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर लव्ह मॅरेजमधूनच सर्वाधिक घटस्फोटाची प्रकरणे समोर येतात, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संजय कारोल यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना गवई यांनी हे मत मांडले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर एका वैवाहिक विवादाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी संबंधित दाम्पत्याचा विवाह हा लव्ह मॅरेज असल्याचे कोर्टासमोर सांगण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना जस्टिस गवई यांनी ‘लव्ह मॅरेजमधूनच घटस्फोटांची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत’, अशी टिप्पणी केली आहे.
मध्यस्थीला पतीचा नकार
सर्वोच्च न्यायालयातील खटल्यामध्ये न्यायमूर्तींनी मध्यस्थी करण्याचा पर्याय सुचवला. मात्र, पतीला हा निर्णय मान्य नव्हता. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका निकालाच्या पार्श्वभूमीवर पतीच्या परवागनीशिवाय घटस्फोट दिला जाऊ शकतो, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. त्यानंतर दोन्ही बाजूंना मध्यस्थी करण्याचे आवाहन या खंडपीठाने केले.
Supreme Court on Love Marriage