इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून अनेकदा काही महत्त्वाचे सल्ले वकिलांना दिले जातात. असाच एक मार्गदर्शनपर सल्ला सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नुकताच वकिलांना दिला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले आहे की, न्यायालयात एखाद्या प्रकरणाशी संबंधित युक्तिवाद करायचा असेल, तर वकिलांनी नेहमी लक्षात ठेवायला हवे की, तुम्हाला एखाद्या लेखकाप्रमाणे प्रकरणातील संपूर्ण तथ्य एका कथेप्रमाणे माहीत असायला हवे. युक्तिवाद असा करायला हवा जसे तुम्ही एखादी कथा सांगत आहात.
एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीच्या वकिलाने दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने संबंधित वकिलाला हा सल्ला दिला. न्यायालयाने या वेळी आरोपीच्या युवा वकिलाला न्यायालयात युक्तिवाद करण्याच्या कलेविषयी सांगितले की, कशाप्रकारे आपले म्हणणे सादर करावे आणि वाक्यांचे एकत्रिकरण करावे. इतकेच नाही तर, न्यायालयाने एका ज्येष्ठ विधिज्ञाला या युवा वकिलाचे मार्गदर्शन करण्यास सांगितले. त्यांना निर्देश दिले की, सुनावणीनंतर १५ मिनिटे ज्येष्ठ वकीलाकडून मार्गदर्शन आवश्य घ्यावे. न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले की, भलेही आम्ही तुम्हाला सवलत दिली आहे. मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही मार्गदर्शन घेणार नाही. जर तुम्ही तसे केले तर पुढील वेळी मोठ्या संकटात सापडू शकता.
खटल्याची सुनावणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीला संबंधित वकील प्रकरणातील तथ्य मांडताना अडखळत होते. तेव्हा न्यायालयाने म्हटले की, तुम्हाला या प्रकरणातील तथ्य एका कथेप्रमाणे ठावूक असणे आवश्यक आहे. त्यानंतर जेव्हा संबंधित वकिलाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा, न्यायालयाने म्हटले की, जेव्हा तुम्ही आरोपीची बाजू मांडण्यासाठी येता, तेव्हा तुम्हाला तुमचे प्रकरण किंवा तुमची बाजू उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख न करता मांडायला हवे.