मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण राज्याचे लक्ष सत्तासंघर्षावरील निर्णयाकडे लागलेले आहे. सर्वोच्च न्यायालय निकाल कुणाच्या बाजूने देणार, याबाबत उत्सुकता ताणल्या गेलेली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांच्या विधानाने खळबळ माजविली आहे. त्यांनी केलेल्या विधानानुसार, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
‘सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या निलंबनाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला तर कायदा स्वच्छ आहे आणि त्यानुसार तो निर्णय घ्यायचा अधिकार आत्ताच्या अध्यक्षांना असेल. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी जे सत्र बोलावले ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार बोलावले नव्हते आणि तो आदेशच चुकीचा ठरवला तर त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात.
कारण उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्र बोलावल्यावर राजीनामा दिला होता. या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय ते सत्र बोलावण्याआधीची जी स्थिती होती ती पूर्ववत करू शकते. अशा स्थितीत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि नरहरी झिरवळ हेच हंगामी विधानसभा अध्यक्ष होतील. असे यापूर्वी एकदा झालेले आहे. एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवट रद्द ठरवली आणि आधीच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा बसवले. हा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे,’ असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.
तर सरकार पडणार नाही
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना उल्हास बापट म्हणाले,‘मुख्यमंत्री केव्हाही राजीनामा देऊ शकतात. त्याला कोणतेही बंधन नाही. हा बुद्धीबळाचा डाव सुरू आहे. आमदार अपात्र ठरले तर सरकारच पडते. त्यामुळे तात्पुरता कुणी दुसरा नेमला तर सरकार पडणार नाही आणि त्यांच्यामागे बहुमतही राहण्याची शक्यता आहे,’ असे बापट म्हणाले आहेत.
Supreme Court Maharashtra Political Crisis Uddhav Thackeray