नवी दिल्ली – एमबीएच्या एका तरुणीचे खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कोऱ्या कागदावर जबरदस्तीने हस्ताक्षर करवून घेणाऱ्या आरोपीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. तरुणीला आपली पत्नी दाखविण्यासाठी खोटे विवाहपत्र (निकाहनामा) तयार करण्यास कोऱ्या कागदाचा वापर केल्याचा आरोप हसीब खान नावाच्या संशयितावर आहे.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तक्रारकर्ती न्यायालयासमोर हजर झाली नाही. तसेच आरोपी खान दोन वर्षांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिलेला आहे. या प्रकरणात आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपीला जामीन दिला जाऊ शकतो, असे खंडपीठाने सांगितले.
तक्रारकर्त्या तरुणीच्या म्हणण्यानुसार, ती हसीब खानकडून कपडे शिवून घेत होती. एकदा कपड्यांचे माप व्यवस्थित घेण्यावरून हसीबने तिला आपल्या दुकानातच ट्रायल घेण्याचा सल्ला दिला. दुकानात ट्रायल रूम नव्हती. त्यामुळे दुकानाचे शटर खाली करून तिने कपडे घालून पाहिले. त्याचदरम्यानचा व्हिडिओ असून तो व्हायरल करण्याची धमकी देत हसीब खानने तरुणीला ब्लॅकमेल करत होता.
त्यानंतर हसीबने जबरदस्तीने कोऱ्या कागदावर तिच्या सह्या घेऊन ऊर्दूमध्ये इनाया खान असे लिहून घेतले. या कागदाचा वापर करून त्याने निकाहनामा तयार करून घेतला. परंतु तरुणी आणि हसीबमध्ये प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनीही लग्न केले, असा दावा आरोपी हसीबने केला. तरुणीने या दाव्यांना फेटाळून लावले.
व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्याशी वाईट कृत्य करत होता. शेवटी तक्रारकर्त्या तरुणीने आपल्या आई-वडिलांना याची माहिती दिली. तिच्या पालकांनी हसीब विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
कुटुंब न्यायालयात याचिका
आरोपी हसीब खानने भारतीय दंडविधानाच्या कलम १२५ अंतर्गत तरुणीला घरी घेऊन जाण्यासंदर्भात प्रकरण नोंदविले. लखनऊ येथील कुटुंब न्यायालयात आरोपीने निकाहनाम्याच्या आधारावर तक्रारकर्त्या तरुणीला आपली पत्नी असल्याचे सांगितले.
दोनदा फेटाळला जामीन
हसीबने दोनदा अलाहाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. परंतु दोन्ही वेळा उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.