नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी वकिलांना मोठी सूट दिली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकिलांना ऑनलाईनरित्या न्यायालयात हजर राहण्याची परवानगी दिली आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, ‘कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे वर्तमानपत्रातील रिपोर्ट्स दाखवतात. अशा परिस्थितीत वकिलांना न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने हजर राहायचे असेल तर ते तसे करू शकतात. ते हायब्रिड (ऑनलाईन) मोडमध्ये देखील कार्य करू शकतात.
आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ४४३५ लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या १६३ दिवसांच्या आकडेवारीत हा उच्चांक आहे. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार ९१ वर पोहोचली आहे. सक्रिय केस म्हणजे ज्या रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या २४ तासात १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी चार जणांचा मृत्यू झाला. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. संसर्गामुळे आतापर्यंत एकूण ५ लाख ३० हजार ९१६ मृत्यू झाले आहेत.
आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या चार दिवसांत मृत्यूचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान, ४० जणांना आपला जीव गमवावा लागला. १ एप्रिल रोजी पाच जणांचा मृत्यू झाला होता. २ एप्रिलला ११, ३ एप्रिलला ९ आणि ४ एप्रिलला १४ जणांचा मृत्यू झाला.
Supreme Court Covid Virus Infection Lawyers