नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काव्य प्रतिभा सर्वांना साथ देते असे नाही, त्यासाठी बाह्य आणि आंतरिक जगाचा एकाच वेळी ज्याला प्रवास करता येतो, त्याला सर्जनशीलता असते, तोच चांगले काव्य निर्मिती करू शकतो, सुमती लांडे यांच्या कविता या संपूर्ण मानव जातीच्या व्यथा आहेत, त्या सकल माणसांच्या कविता आहेत. या कवितेत माणसांच्या जगण्याची गोष्ट सांगितलेली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. रावसाहेब कसबे यांनी केले
विश्वास ग्रुप, नाशिक यांच्या सौजन्याने आणि कॉपर कॉइन (दिल्ली ), रेड स्पॅरो मीडिया हाऊस (दिल्ली ), इंडिया दर्पण (नाशिक ), सोशल नेटवर्किंग फोरम (नाशिक ) यांच्या वतीने डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग विश्वास गार्डन सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दि. १७ रोजी ‘सुमती लांडे कविता समग्र कविता ‘ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्रा. कसबे बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून कवी व अभिनेते सयाजी शिंदे, प्रसिद्ध कादंबरीकार रंगनाथ पठारे , प्रसिद्ध समीक्षक डॉ. राजन गवस उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक रावसाहेब कसबे उपस्थित होते. व्यासपीठावर कॉपर कॉइनचे सरबजीत गरचा, विश्वास ग्रुपचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, कविता मुरूमकर, प्रसिद्ध कवयित्री सुमती लांडे, कवी प्रकाश होळकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्रसिद्ध कादंबरीकार व समीक्षक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते सुमती लांडे यांच्या समग्र कवितांचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. कसबे यांनी काव्य निर्मिती कशाप्रकारे घडते याचे सविस्तर वर्णन केले. तसेच मला देखील आता सुमती लांडे यांच्या कवितांची पुन्हा नव्याने ओळख झाली. सुमती यांनी आपल्या कवितेत अनेक उपमा वापरल्या आहेत, त्यामध्ये गौतम बुद्ध यांचा देखील उल्लेख आढळतो, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी राजन गवस म्हणाले की, सुमती लांडे यांच्या कवितेमुळे खेड्यापाड्यातील स्त्रियांना आपल्याला लिहिता येऊ शकते हे शिकवले. महिलांना धिटपणे जगण्याचे त्यांनी शिकवले. प्रकाशन क्षेत्रात नवतरुणांना पुढे आणण्याचे काम सुमतीताई यांनी केले, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कवयित्री सुमती लांडे यांना मनोगत व्यक्त केले, आपल्या मनोगतात त्यांनी आपल्या कवितेचा प्रवास स्पष्ट केला. तसेच आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो, खूप लोकांचे आपल्याला प्रेम मिळाले, आपण माझ्या कवितेवर प्रेम केले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांनी ‘आजीची कविता ‘ तसेच अन्य कविता सादर केल्या.
याप्रसंगी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या जीवनात आलेले विविध अनुभव सांगताना कवितेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच मला कविता खूप आवडतात असेही सांगितले. तसेच आपण वृक्ष प्रसाद योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. झाडा एवढा सेलिब्रिटी कोणीच नाही, कारण सेलिब्रिटी सावली देत नाही, झाड सावली देते, झाडे फळे आणि फुले देतात असेही त्यांनी सांगितले. काही कविता देखील सादर केल्या. यावेळी रंगनाथ पठाडे म्हणाले की, कविता अनेक प्रकारच्या आकलनाला खुल्या असतात, त्यावर ती अवलंबून असते याप्रसंगी प्रास्ताविक सरबजीत सिंग यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कविता संपादनाविषयी कविता मुरूमकर यांनी विचार मांडले.
अभिनेते व कवी किशोर कदम यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, तरी ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांची संवाद साधला. सयाजी शिंदे, राजन गवस, रंगनाथ पठारे यांनी मनोगत व्यक्त केले. रावसाहेब कसबे यांनी अध्यक्षीय मनोगत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्रकाश होळकर यांनी केले संज्योत बानूबाकोडे यांनी आभार मानले.
…
दरम्यान, दिवसभर प्रसिद्ध कवयित्री सुमती लांडे यांच्या कवितांवर तीन सत्रात परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या कवितांचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, असा सूर विविध सत्रातील परिसंवादातून मान्यवरांनी व्यक्त झाला.
उद्घाटन सत्र…
दरम्यान, प्रथम सत्रात प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पगार, कविता मुरूमकर, प्रा.डॉ. भास्कर ढोके यांनी विचार मांडले. व्यासपीठावर विश्वास ग्रुपचे अध्यक्ष विश्वास ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कादंबरीकार रंगनाथ पठारे होते. यावेळी कविता मुरूमकर म्हणाल्या की, सुमतीताई यांच्या कविता या मराठी कवितेचा पैस रुंदावणाऱ्या आहेत, यात भावनिक नोंद आहे, अशी कविता मराठी स्त्री कवितेत यापुर्वी कवी कधीच अनुभवायला आलेली नाही, असे दिसून येते. त्यांची कविता ही जीवनाच्या विविध अवस्थांमधून जाताना दिसते. ‘मला ध्यानस्थ होता येत नाही, ‘ असे त्या कवितेत म्हणतात. त्याचप्रमाणे ‘बांधावर घरटं बांधलं म्हणून झाडाने फांदीवर हक्क सांगू नये, असे सांगून त्या मानवी जीवनाचे द्वंद स्पष्ट करतात, असेही मुरूमकर यांनी सांगितले. यावेळी एकनाथ पगार म्हणाले की, सुमती लांडे यांच्या शब्दाशब्दांमध्ये त्यांच्या कवितेतील आशय दडलेला आहे. त्यांच्या कवितेत तत्व चिंतनाचे स्वर आणि सार आहे. शोक, संवेदना आणि करुणा त्यांच्या कवितेतून दिसून येते, असेही असेही पगार यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रा. भास्कर ढोके म्हणाले की, सुमती ताईंची कविता मला समई सारखी वाटते, त्यांची आजीची कविता असो की झरीना यामधून स्त्रीपणाचे अस्तित्व जाणवते.याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना रंगनाथ पठारे यांनी सुमतीताई यांच्या अनेक कवितांचे दाखले दिले. तसेच सुमतीताई लांडे यांनी आयुष्यभर मैत्री भाव जपला, महाराष्ट्रभर माणसे जोडण्याचे काम केले, पुस्तकांची मैत्री केली, प्रत्यक्ष नाटककार विजय तेंडुलकर यांनी सुमती लांडे यांच्या कवितेचे कौतुक केले, असेही असेही पठारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता पाटील यांनी केले. तर मान्यवरांचा सत्कार प्रमोद गायकवाड, मृन्मयी लांडे यांनी केले.
सुमती लांडे यांच्या कवितेतील भाषिक संवेदना व रूपबंध ‘ या विषयावरील चर्चासत्र…
दुसऱ्या सत्रात ‘ सुमती लांडे यांच्या कवितेतील भाषिक संवेदना व रूपबंध ‘ या विषयावरील चर्चासत्रात प्रसिद्ध कवी मंगेश नारायण काळे, लेखिका संध्या नरे पवार, कवी किरण येले, आणि चित्रकार धनंजय गोवर्धने यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक राजन खान होते. या सत्रात बोलताना कवी किरण येले म्हणाले की, कवयित्री सुमती लांडे यांच्या कवितेमध्ये स्त्रियांच्या मनातील अंतरिक भावभावना व्यक्त होताना दिसतात. समाजात आपण काही देणे लागतो, हे या कवितेतून जाणवते. विशेष म्हणजे यात ‘स्व ‘ चा ‘स्व ‘ शी झालेला संवाद दिसतो, असेही येले म्हणाले. तर चित्रकार धनंजय गोवर्धने यांनी चित्रफितीच्या माध्यमातून सुमती लांडे यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ कसे रेखाटले गेले हे स्पष्ट केले. जसे कमी रेषेत चित्र समजते, त्याप्रमाणे कमी शब्दात कविता उमगते आणि सुमतीताई यांच्या कविता अशाच आहेत, असे गोवर्धने यांनी स्पष्ट केले. त्यानंतर लेखिका संध्या नरे पवार यांनी आपल्या मनोगतात मराठीतील कवयित्रींच्या विविध रचनांचा आढावा घेऊन त्यात कवयित्री सुमती लांडे यांच्या कवितेची वेगळेपण अधोरेखित केले. यावेळी संध्या नरे पवार म्हणाल्या की, सुमतीताई यांची कविता स्त्री वादी आहे, किंबहुना स्त्री वादी कविता कशी असावी, याचा वस्तूपाठ त्यांच्या कवितेतून दिसतो, असे सांगून त्यांनी कमळकाचा, जरीना आदि कवितांचे विवेचन केले. कवी मंगेश नारायण काळे यांनी सांगितले की, कवयित्री सुमती लांडे यांच्या कविता समग्रपणे प्रकाशित होत आहे. ही अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यांच्या कवितेची पाठराखण प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर, प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते आणि प्रसिद्ध कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी केली आहे. सुमती ताई यांची कविता आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यात भेटते, तेव्हा वेगळीच भासते. त्यांची कविता ही व्यक्तीवादी कविता आहे, त्यात निसर्ग, सुख – दुःख, कष्ट अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. अध्यक्षीय समारोप करताना राजन खान म्हणाले की, सुमतीताई यांची कविता मला ‘ सुफी ‘ पद्धतीची वाटते, म्हणजे ही कविता आपल्याला आपल्यातच तल्लीनतेने व्यक्त होताना दिसते. कवयित्रीच्या जगण्याप्रमाणे त्यांची कविता आहे, विशेष म्हणजे सुमतीताई यांच्या कवितेत मला आईपण जाणवते, पण हे आईपण हे स्त्रीपणाचे नाही, तर माणूसपणाचे आहे, त्याची कविता निसर्गातून येते, कारण कवयित्री ही स्वतः निसर्गाचाच भाग आहे, असेही राजन खान यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता पाटील यांनी केले. तर मान्यवरांचा सत्कार सुमित लांडे, प्रमोद गायकवाड, संज्योत लांडे, शाल्मल लांडे यांनी केला. याप्रसंगी सविता खाल्लाळ यांनी सुमती लांडे यांना फोटो फ्रेम केलेली एक स्वलिखीत कविता भेट दिली.
तिसऱ्या सत्रात सुमती लांडे यांच्या कवितेतील आशयसूत्रे :
स्त्री संवेदन, निसर्ग संवेदन, मिथक सृष्टी या विषयावर प्रसिद्ध कादंबरीकार दीपक करंजीकर, प्रा. नितीन आरेकर, नम्रता फलके, प्रा. अरुण ठोके यांनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक राजन गवस होते. या सत्रात प्रा. नितीन आरेकर म्हणाले की, कमी शब्दात आणि कमी अक्षरात जास्तीत जास्त आशय पोहोचविण्याचे कार्य सुमतीताई यांच्या कविता करतात. सुमतीताईंच्या कविता या वाचकांच्या मनाचे दार उघडणाऱ्या आहेत. कमळकाचा सारख्या कवितेतून स्त्रीचे संपूर्ण भावविश्व व्यक्त होते. श्रेष्ठ कविता या नव्या कवी, लेखकांना जन्म देतात, त्यामुळे त्यांच्या आजीचे गाव, पुराणपुरुष असो की झरीना या कविता आपले जीवन समृद्ध करतात. सुमतीताईंच्या कविता मिथक जन्माला घालतात, पण ही मितके जीवनाच्या अनुभवातून आलेली आहेत. म्हणून त्या जीवनाचे सार सांगतात, असेही ते म्हणाले. यावेळी प्रा. ढोके म्हणाले की, स्त्री स्वातंत्र्याच्या पुरस्कार आपल्याला सुमतीताई यांच्या कवितेतून दिसतो. मात्र स्व वादाचे भान, सूक्ष्मचिंतन, स्त्री जीवनाचे दुःख यातून जाणवते, खरे म्हणजे जीवनाचे दर्शन घडवण्याऱ्या कविता आपल्याला आढळतात, असे म्हणाले ते म्हणाले.
नम्रता फडके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कविता हे कवीचे आत्मचरित्र असते, खरे म्हणजे उत्तम कवितेची ही ओळख आहे. सुमतीताई यांनी आपल्या अनेक कवितेत मोजक्या शब्दात खूप मोठा असे मांडला आहे, स्त्रीचे अस्तित्व म्हणजे काय हे त्यांनी कवितेतून मांडले आहे. मराठी कवितेला सुमतीताई यांनी समृद्ध केले, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी दीपक करंजीकर कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत, मात्र त्यांचे मनोगत ध्वनीचित्रफितेतून दाखविण्यात आले, यावेळी करंजीकर यांनी म्हटले की. सुमतीताईंची कविता ही वास्तविकतेतून येते आपण त्यांच्या कविता वाचून हरकून जातो. सृजनाची ज्योत त्यांनी वाचकांच्या मनात पेटवली आहे. तर अध्यक्षीय समारोपात राजन गवस यांनी सांगितले की, कविता करताना कवीला मोठे कष्ट पडतात, कारण त्याला त्याच्या मनातील भावभावनां योग्य शब्दातून वाट करून द्यायची असते, आपल्याला सुमती लांडे त्यांच्या कविता आणखी जास्त समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या खूप आशय घन आहेत. अल्प अक्षरात त्यात खूप मोठा आशय दडलेला आहे, असेही ते म्हणाले याप्रसंगी देविदास चौधरी, स्वागत थोरात, तेजस बस्ते, जयप्रकाश सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मंगेश नारायण काळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मृण्मयी पाटील लांडे यांनी केले.
….