इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता त्यांची पहिला प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितले की, पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणे जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. जर या गुन्ह्याच्या शिक्षेचे हकालपट्टीत रुपांतर होत असेल तर त्याचं मी काय उत्तर देणार…
ते पुढे म्हणाले की, मी पक्षाविरुध्द कोणतंही वक्तव्य केलेल नाही. मी जर ते केलेले असेल तर ते मीडियाच्या माध्यमातून पुढे आणावे. पण, संघटनात्मक बदल झाले तेव्हा नाराजी व्यक्त केली. काल उघडपणे बोलून दाखवले. तो जर गुन्हा असेल तर मी केलाय असा पुनरुच्चार त्यांनी केला.
कारवाईनंतर उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क साधारण का? या प्रश्नावर ते म्हणाले की, हकालपट्टी नंतर कोणता संवाद साधणार, न्यायालयातसुध्दा एकतर्फी निर्णय होत नसतो. दोन्ही बाजून एेकल्यानंतर निर्णय दिला जातो. असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना कार्यालयात आज काही नियोजित प्रवेश होते. पण, काही वैयक्तिक कार्यक्रमामुळे मी बाहेर आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयात जाऊ शकलो नाही असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत हकालपट्टीची घोषणा
शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यावेळी पक्षविरोधी करावाई केल्याने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
दोन दिवसापूर्वी खा. संजय राऊत नाशिकमध्ये असतांना बजगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल त्यांनी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह १० ते १२ जण नाराज असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फुटीचे वारे वाहत असल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटाने अगोदर ही कारवाई करत मोठा धक्का दिला आहे.
आज शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख डी. जी. सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत सुधाकर बडगुजर गैरहजर होते. तर महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड उपस्थित होते.