नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले आहे. या मोहिमे अंतर्गत आज पालम वायुसेना विमानतळावर वायुसेनेचे विशेष विमान (सी-17) 400 भारतीय नागरिकांना घेऊन दाखल झाले आहे. यात महाराष्ट्रातील 19 नागरिकांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून सुदान येथुन परत आणलेल्या नागरिकांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आले आहे. सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.
सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य
दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वयाचे कार्य होत आहे. विमानतळावर स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या नागरिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे.
सुदाननमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील नागरिकांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
Sudan Rescue Operation Kaveri 19 Maharashtrian Delhi