सावरगावच्या सुवर्णा कुशारे
जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर यशस्वीरीत्या शेती करत साडेतीन एकर असणारी शेती १७ एकरपपर्यंत नेणार्या सुवर्णा कुशारे या नवदुर्गेचा प्रवास जाणून घेऊया – सुवर्णा भास्कर कुशारे (सावरगाव,निफाड)
पिंपळद (लासलगाव) चे माहेर असलेल्या सुवर्णा कुशारे यांना लग्नापूर्वी शेतीत अनुभव नसला तरी वडिलांची शेतीविषयी असणारी आवड त्या लहानपणापासूनच बघत आल्या होत्या. पुढे २००६ साली सावरगाव येथील भास्कर कुशारे यांच्याशी ताईंचा विवाह झाला. भास्कर कुशारे हे मार्केट कमिटी मध्ये नोकरीस होते. कुटुंबात त्यांच्याव्यतिरिक्त ताईंचे दीर शंकर कुशारे, सासरे साहेबराव कुशारे हे होते.
दीर शंकर यांचे शिक्षण आणि पती भास्कर यांची नोकरी या कारणास्तव दोघेही घरच्या शेतीत वेळ देऊ शकत नव्हते. ताईंचे लग्न झाले तेव्हा साडेतीन एकराचे शेतीक्षेत्र होते, जे पूर्णपणे सासरे बघायचे. ताई घरकाम सांभाळून सासऱ्यांना हातभार लावण्यास जात. सासरे साहेबराव कुशारे यांचे शेतीला व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर विकसित करण्याचे स्वप्न आधीपासून होतेच पण पुढे वयोमानाने सासऱ्यांना हे सर्व व्यवस्थापन करणे शक्य होत नव्हते.
घरातील कोणीतरी इतर सदस्याने हि जबाबदारी घेणे गरजेचे होते. ताईंच्या पतीची नोकरी आणि दिराचे शिक्षण यामुळे ते दोघेही यात वेळ देऊ शकत नाही हे पाहता सासऱ्यांचा हा वारसा स्वतः पुढे नेण्याचा निर्धार सुवर्णा ताईंनी केला कारण सासऱ्यांची शेतीविषयक असणारी हि ओढ त्या आधीपासून बघत आल्या होत्या आणि त्यातूनच त्यांना देखील या शेतीची आवड निर्माण झाली. आणि हळूहळू ही सर्व जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेण्यास सुरुवात केली.
आधीपासूनच द्राक्षबाग केली जात. सुरुवातीला थॉमसन, सोनाका या व्हरायटी लावलेल्या होत्या आणि स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष दिली जात. पुढे हीच द्राक्ष निर्यात करण्याचे ठरविले. यामध्ये द्राक्ष निर्यात करण्यासाठी व्यवस्थापन कसे करायचे यासाठी सासऱ्यांचे मार्गदर्शन तर होतेच सोबत दीर शंकर कुशारे यांच्याकडून देखील तांत्रिक बाबींविषयी माहिती मिळत गेली. घरी जाउ रूपाली ह्या सर्व कुटुंबाची जबाबदारी पार पडत असल्याने ताई शेतीला आपला संपूर्ण वेळ देऊ शकत होत्या. ह्या सगळ्यांसोबत पती भास्कर कुशारे हे शेतीत वेळ देऊ शकत नसले तरी ताईंच्या ह्या मेहनतीला ते कायम प्रोत्साहित करत आले.
ज्यामध्ये अगदी लहान बाबी जसे काडी नियोजन, औषध व्यवस्थापन, माल कसा हाताळायचा, निर्यात करण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी लागते हे सर्व त्या शिकत गेल्या. २००९ पासून सह्याद्रीच्या माध्यमातून द्राक्ष निर्यात करण्यास सुरुवात केली. या सगळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले ज्यामध्ये वातावरण बदलामुळे पिकावर त्याचे परिणाम होत तसेच बऱ्याचदा मजूर नसल्याने अडचणी येत, कधी निसर्ग आणि पावसामुळे वेळप्रसंगी स्वतः रात्रीचे टॉर्च लावून औषध कालवणे, सासऱ्यांना ट्रॅक्टर चालवणे शक्य होत नसल्याने मग स्वतः ट्रॅक्टर ओढणे मागे एखादा गडी पावडर मारायला असत अश्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागत. पण या अनुभवातूनच हे सर्व त्या स्वतः सांभाळू शकता याविषयी एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होत गेला.
आता या सर्व कामांमध्ये अडचण कुठे जाणवत नाही ज्यामध्ये मजुरांचे नियोजन कसे करायचे, बागेचे वेळोवेळी केले जाणारे व्यवस्थापन, वेळप्रसंगी मजूर नसताना स्वतः ट्रॅक्टर चालवणे हे सर्व करण्यास त्या आता सक्षम झाल्या आहेत. दरम्यान एक कठीण प्रसंग असा आला की, २०१५ नंतर द्राक्ष पिकात येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे होणारे नुकसान यातून द्राक्ष बाग तोडण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला होता परंतु सुवर्णा यांचा त्याला विरोध होता. त्यांनी द्राक्ष बाग न तोडण्याची त्यांची भूमिका कुटुंबाला पटवून दिली. त्यानंतर सर्वात आधी त्यांनी जुनी झालेली बाग काढून टाकली. त्यामध्ये नवीन वाणाची लागवड केली. या सगळ्याचे योग्य नियोजन करून द्राक्ष पिकातून आर्थिक उत्पन्न वाढविले.
त्यामुळे त्यांचा हा निर्णय आज कुटुंबाची आर्थिक बाजू सक्षम करण्यास महत्वपूर्ण ठरला. यामध्ये जसजसे उत्पन्न चांगले येत गेले तसतसे नवीन जमीन घेऊन शेतीक्षेत्र वाढविण्यात आले. साडेतीन एकराचे असणारे हे क्षेत्र मेहनतीच्या जोरावर आता १७ एकारपर्यंत वाढले. या सगळ्या प्रवासात सगळ्यात महत्वाचा आधार हा कुटुंबाचा होता.
पूर्वीच्या द्राक्ष व्हरायटीला निसर्गाच्या बदलामुळे अनेक अडचणी येत हे लक्षात घेता आज अनेक व्हरायटी लावण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये आरा १५, क्रिमसन, थॉमसन, मामा जम्बो, सोनाका या सर्व व्हरायटी आहेत. पुढे जाऊन याच शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शक्य तितक्या क्षेत्रात नवीन व्हरायटी लावण्याचे ताईंचे नियोजन आहे. शेतीविषयी कायम आपली निष्ठा जोपासत आलेल्या आणि प्रसंगी या शेतीसाठी आपली ठाम भूमिका घेऊन ती सिद्ध करून दाखविणार्या सुवर्णाताईंच्या खंबीर व्यक्तिमत्वास सलाम! (बघा त्यांचा व्हिडिओ)
(लेख व व्हिडिओ सौजन्य – सह्याद्री अॅग्रो फार्म)








