नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई सारख्या महानगरात 8-9 वर्षे राहून केवळ शेतीच्या ओढीने ज्योती संजय निचित गावाकडे परतल्या. शेतीतील अनेक आव्हानांशी सामना करीत यशस्वी द्राक्ष निर्यातीपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. ज्योती यांचा विवाह 2003 मध्ये निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथील संजय निचित यांच्याशी झाला. या काळात संजय हे नोकरी निमित्ताने मुंबई येथे स्थायिक झालेले होते. त्यांच्यासोबत कुटुंबात वडील, भाऊ हे ही होते. 2005 मध्ये या दांपत्याला पुत्ररत्न झाले. सगळे सुरळीत सुरु असतांना 2011 हे वर्ष मात्र संकट घेऊनच उगवले.
संजय यांची कंपनी बंद पडली आणि त्यांची नोकरी गेली. कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नावर पुढची 3 वर्षे त्यांनी मुंबईत काढली. उत्पन्नाच्या पर्यायाचा शोध सुरु असतांनाच ज्योती यांनी गांवाकडे असलेल्या 3 एकर शेतीकडे वळण्याचा आग्रह धरला. तशीही त्यांना शेतीची आवड आधीपासूनच होती. संजय यांनीही ज्योती यांच्या मताला दुजोरा देत गावाची वाट धरली
गावात शेतीत आल्यानंतर कुठून सुरुवात करायची हा प्रश्न होताच. शून्यापासून सुरुवात करायची होती. गाव परिसराचे द्राक्ष हेच मुख्य पिक. पूरक साधनांच्या बाजारपेठाही आसपास. त्यामुळे द्राक्षपिक करायचे ठरले. मग प्रश्न आला भांडवल उभारणीचा. मुंबईतील नोकरी सुटल्यानंतर कंपनीकडून मिळालेली फंडाची थोडीफार रक्कम जवळ होती. तीही विहिर खोदण्यात व शेतात छोटंसं घर बांधण्यात संपून गेली होती. संजय यांनी शेतीवर 7 लाखांचे कर्ज घेतले.
यामधून 2014 साली द्राक्षबाग उभी केली. त्यासोबत दुधाचा जोडधंदाही सुरु केला. द्राक्षपिकाविषयी खरंतर दोघांना अनुभव नव्हता पण ‘सह्याद्री‘ फार्म्सचे पिक तज्ज्ञ, शास्त्रज्ञांचे त्यांना चांगले साह्य मिळत गेले. संजय यांचे 7 वीपर्यंत तर ज्योती 12 वी पर्यंत शिकलेल्या. ज्योती यांनी पिकाविषयी ज्ञान बारकाईने समजून घेतले. औषधांची माहितीपत्रके, नावे याबाबत त्या नोंदी घेत व त्या प्रमाणे उत्पादनांची मागणी करीत. त्यानुसार संजय कृषि सेवा केंद्रातून औषधे साहित्य आदी आणत असत. पिकाचे व्यवस्थापन, मशागतीची कामे, ट्रॅक्टर चालविणे या बाबींवरही ज्योती यांनी प्रभुत्व मिळविले.
द्राक्ष बागेचे उत्पादनाचे 2015 हे पहिले वर्ष होते. पहिल्याच वर्षी 212 क्विंटल उत्पादन मिळाले. बराचसा माल निर्यातीलाही गेला. दोघांची मेहनत फळाला आली. यामुळे दोघांचाही शेतीतला हुरुप वाढला होता. दुसरं वर्ष 2016 मात्र आव्हानाचं ठरलं. ऐन फुलोऱ्यात गारपीट झाली आणि पूर्ण हंगाम वाया गेला. तिसऱ्या वर्षी 2017 ला जेमतेमच उत्पन्न मिळालं. पुढची काही वर्षे मध्यम चांगली अशी आली- गेली. आता द्राक्षशेतीत सूर सापडला होता. वर्ष 2020 मध्ये माल चांगला निघाला होता. यंदा पूर्ण माल निर्यातक्षम करायचा असं ठरवलं होतं. निर्यातीसाठीचा नमुनाही पास होऊन आल्यामुळे मनात आनंद होता.
अचानक रात्री जोरदार वादळी पावसाचा घाला पडला. पूर्ण बाग कोसळून जमीनदोस्त झाली. सकाळी उजाडल्यावर जमेल तसे पिक वाचवण्याचा प्रयत्न सुरु झाला. शासकीय यंत्रणेनेही नुकसानीबाबत हळहळ व्यक्त करीत पंचनामा केला. याही परिस्थितीत ‘सह्याद्री‘च्या टिमने प्रयत्नांची शर्थ केली. त्या घटनेत ६०-७० क्विंटल मालाचे नुकसान झाले पण बाग कोसळूनही 154 क्विंटल निर्यातक्षम द्राक्ष माल काढण्यात यश आले.
यावर्षीच्या उत्पन्नाने कर्जाचा डोंगर बराच हलका केला. या सारख्या कितीतरी कठीण प्रसंगांमध्ये ज्योती यांनी पती संजय यांना भक्कम साथ दिली. या संकटांनीच खूप शिकवल्याचे ज्योती सांगतात. शेतीतील कोणताही अनुभव नसताना शहरातून गावाकडे येऊन संकटकाळी याच शेतीला कुटुंबाचा भक्कम उत्पन्नाचा स्त्रोत बनवून कोसळलेला संसार उभा करणार्या नवदुर्गेला सलाम!
Success Story of Women Farmer Jyoti Nichit