अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक १ ते २० डिसेंबर या कालावधीत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ३५ लाख १३ हजार २७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा जप्त करण्याबरोबरच अवैध मद्यावर कार्यवाही करून ११७ गुन्हे दाखल करत १०१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
जामखेड येथील राजेवाडी फाटा बस स्थानकासमोर २० डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कार्यवाहीत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा व १ वाहनांसह ६ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात अप्पासाहेब महादेव कुमटकर यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिनांक १ ते २० डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील अवैध मद्यावर कार्यवाही करण्यात आली. या ११७ गुन्हे दाखल करत १०१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कार्यवाहीत देशी-विदेशी मद्य व ११ वाहनांसह २८ लाख ८३ हजार २७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, पुणे विभागीय आयुक्त अनिल चासकर व अहमदनगर अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक जी.टी.खोडे, दुय्यम निरीक्षक डी.आर.ठोकळ, आर.पी.दांगट, टी.बी.करंजुले, पी.डी.गदादे, ए.ए.कांबळे, डी.ए.खैरे, एस.ए.पवार व सुनंदा अकोलकर हे या मोहीमेत सहभागी झाले होते.
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मदयार्क, हात्तभट्टी दारु, ताडी इत्यादी निर्मिती व विक्रीवर कारवाईसाठी नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री होत असल्यास बाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागास द्यावी. असे आवाहनही श्री.पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
State Excise Department Action 35 Lakh Liquor Seized