मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, स्टेट बँकेने आता नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत ग्राहकांना अनेकानेक सुविधा देऊ केल्या आहेत. आता व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही बँकेशी निगडीत काही कामेही करू शकाल. भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांसाठी व्हॉट्सॲपवर बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला बँकेचे काही काम असेल तर दरवेळेस बँकेत जाण्याची गरज पडणार नाही.
व्हॉट्सॲप बँकिंग सेवेद्वारे ग्राहकाला त्यांच्या खात्यात नेमकी किती रक्कम शिल्लक आहे, म्हणजेच अकाऊंट बॅलन्स किती आहे, हे जाणून घेऊ शकतात. तसेच मिनी स्टेटमेंटही मिळेल, ज्यामध्ये मागील ५ ट्रॅन्झॅक्शनची माहिती मिळू शकेल. बँकेचे खातेधारक एटीएम किंवा बँकेमध्ये न जाताच व्हॉट्सॲपवर मिनी स्टेटमेंटद्वारे माहिती मिळवू शकतात, असे एसबीआयने नमूद केले आहे. त्यासाठी तुमचे एसबीआय बँकेत खाते असणे आवश्यक आहे, त्यानंतर तुम्ही एसबीआय व्हॉट्सॲप बँकिंग सर्व्हिसचा वापर करू शकता.
व्हॉट्सॲप सर्व्हिसचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम एसबीआय अकाऊंट रजिस्टर करावे लागेल व एका SMS द्वारे परवानगी द्यावी लागेल. एसबीआय व्हॉट्सॲप बँकिग सर्व्हिससाठी रजिस्टर करण्यासाठी (SMS WAREG A/C No) असे लिहून तुमच्यया रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 917208933148 या नंबरवर SMS पाठवावा लागेल. त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एसबीआय व्हॉट्सॲप सर्व्हिसचा वापर सहजपणे करू शकाल.
त्यानंतर तुम्हाला (+909022690226) या व्हॉट्सॲप नंबरवर ‘Hi’ असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर एक पॉप-अप मेसेज उघडेल. त्या नंतर तुम्हाला व्हॉट्सॲपवर अकाऊंट बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, डी रजिस्टर व्हॉट्सॲप बँकिंग सर्व्हिस असे पर्याय देण्यात येतील. त्यापैकी जो पर्याय तुम्ही निवडाल त्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळेल. त्याशिवाय जर तुम्हाला अकाऊंट बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्हाला 1 नंबर टाइप करावा लागेल. मिनी स्टेटमेंटबद्दल माहिती हवी असल्यास तुम्हाला व्हॉट्सॲपवर 2 नंबर टाइप करावा लागेल,तर ही सेवा मिळेल.
State Bank of India SBI WhatsApp Banking Facility
Technology Service