इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्या असो की खासगी किंवा सरकारी बँक यांचा कारभार संचालक मंडळाच्या नियमानुसार चालतो. वेळोवेळी या संचालकांच्या बैठका होत असतात, या बैठकीसाठी प्रचंड खर्च देखील होत असतो. तसेच बँकेचे अध्यक्ष असो की संचालक यांच्या पगारावर देखील प्रचंड रक्कम खर्च होते. स्टेट बँक ऑफ इंडिया मधील अध्यक्ष यांचा पगार आणि संचालकांच्या बैठका यांच्यावर देखील प्रचंड खर्च होत असल्याची माहिती समोर आली आहे. या बँकेच्या अध्यक्ष यांचा पगार ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे अध्यक्ष दिनेश कुमार कारा यांना 2021-22 या आर्थिक वर्षात सुमारे 34.42 लाख रुपये वेतन देण्यात आले आहे, जे SBI चेअरमन रजनीश कुमार यांच्या पगारापेक्षा सुमारे 13.4 टक्के अधिक आहे. तर बँकेच्या चार व्यवस्थापकीय संचालकांना 31.66 लाख ते 32.62 लाख रुपये पगार देण्यात आला आहे, अशी माहिती SBI च्या आर्थिक वर्ष 2022 च्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.
एसबीआयच्या नियमानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये कारा यांचा मूळ पगार सुमारे 27 लाख रुपये होता. तर 7,42,500 रुपये महागाई भत्ता देण्यात आला आहे. अशाप्रकारे, दिनेश कुमार कारा यांना एप्रिल 2021 ते मार्च 2022 या आर्थिक वर्षात 2022 मध्ये एकूण 34,42,500 रुपये देण्यात आले आहेत.
कारा यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये SBI चे अध्यक्षपद स्वीकारले. तसेच याआधी कारा यांनी SBI चे व्यवस्थापकीय संचालक ग्लोबल बँकिंग आणि उपकंपनी म्हणून कार्यभार सांभाळला होता. कारा हे सन 1984 मध्ये प्रोबेशनल ऑफिसर म्हणून SBI मध्ये रुजू झाले होते. तसेच कारा यांना बँकिंग क्षेत्रातील 38 वर्षांचा अनुभव आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, कारा यांनी 38.12 लाख रुपयांना घर घेतले आहे.
SBI चे व्यवस्थापकीय संचालक चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी यांना 2021-22 या आर्थिक वर्षात 32.62 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार देण्यात आला आहे. त्याच वेळी अश्विनी भाटिया यांना 32.15 लाख रुपये आणि स्वामीनाथन जानकीरामन यांना 31.74 लाख रुपये देण्यात आले आहेत. तर अश्विनी कुमार तिवारी यांना 31.66 लाख पगार देण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये SBI ने केंद्रीय बोर्ड आणि बोर्ड-स्तरीय समित्यांच्या विविध बैठकांना उपस्थित राहण्यासाठी संचालकांना सुमारे 1.52 कोटी रुपये दिले. SBI संचालकांना केंद्रीय बोर्डाच्या बैठकींना उपस्थित राहण्यासाठी 70,000 रुपये देण्यात आले आहेत.