अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरु झाली आहे. ऑनलाइन माध्यमातूनही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मॉक अर्जदेखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. प्रवेश अर्जाचे दोन भाग असून, पहिला अर्ज विद्यार्थी निकालापूर्वी भरु शकत होते. आता दुसऱ्या अर्जासाठी मात्र विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल लागणं अद्याप बाकी असून हा निकाल लागल्यानंतरच विद्यार्थी दुसरा अर्ज भरु शकतील.
सध्या राज्यातील पाच महानगरपालिका क्षेत्रांमधून अकरावी प्रवेशाची नोंदणी सुरु आहे. या क्षेत्रांमधल्या विद्यार्थ्यांकडून अर्जाचा भाग १ भरणे सुरु आहे. भाग २ मात्र विद्यार्थ्यांना लगेच भरता येणार नाही. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे निकाल जुलैमध्ये लागण्याची शक्यता आहे. सीबीएसईचा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तर याच दरम्यान आयसीएसईचा निकाल लागू शकतो.
मुंबई विभागात गेल्या वर्षी आयसीएसईचे आठ हजार तर सीबीएसईच्या पाच हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला होता. ही संख्या विचारात घेता आणि राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची संख्या विचारात घेता प्रवेश प्रक्रियेत गुंतागुंत होऊ नये म्हणून दुसरा अर्ज भरण्याची प्रक्रिया एकाचवेळी सुरु करण्यात येणार आहे.
येथे करा अर्ज
11thadmission.org.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा अर्ज १ भरलेला नाही ते यावर हे अर्ज भरु शकतील. तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) दहावी व बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना तो cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर दिलेला रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून निकाल पाहता येणार आहे.
standard eleventh admission procedure important update education