मुंबई – राज्यात एसटी कामगार संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारले आहे. याच अंतर्गत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी आज दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कर्मचारी संघटनांनी त्यांची सर्व आपबीती राज यांच्यासमोर कथन केली. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाना सध्या कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यांच्यासमोर कोणते प्रश्न आहेत, हे त्यांनी राज यांना सांगितले. कामगार संघटनांचे सर्व सविस्तर ऐकून घेतल्यानंतर राज यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राज म्हणाले की, मी व मनसे पूर्णपणे एसटी कामगारांच्या पाठिशी आहे. तुमच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मात्र, माझी एक अट आहे. ती म्हणजे, आतापर्यंत एकूण ३२ एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. ही बाब योग्य नाही. आंदोलने, चर्चा यातून मार्ग काढता येतो. आत्महत्या हा योग्य पर्याय नाही. आधी तुम्ही आत्महत्या थांबवा. तसे ठाम आश्वासन द्या, तेव्हाच मी तुमचे नेतृत्व करेन, असे राज यांनी सांगितले. आपल्या सर्वांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करेन, अशी ग्वाही राज यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1458766432884297731