बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेतील कणा असलेल्या एसटी बसची दुरवस्था नेहमीच चर्चेत असते. गळक्या, खिडक्या नसलेल्या, खिडक्या बंद असलेल्या, भरपूर धूर ओकणाऱ्या, नादुरुस्त आणि विविध समस्यांनी ग्रस्त अशा बसेस आपण नेहमीच पाहतो. पण, एका एसटी बसमुळे दोन तरुणांचे चक्क हातच तुटले आहेत. त्यामुळे ही बाब संपूर्ण राज्यातच चर्चेची ठरली आहे.
धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले गेले आहेत. आज सकाळी (१६ सप्टेंबर) ही घटना घडली आहे. दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी सुरुवातीला मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यानंतर त्यांना जळगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मलकापूर आगारातील बस पहाटे साडेपाच वाजता मलकापूरहून पिंपळगावदेवी येथे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी पिंपळगावदेवी आणि मलकापूर दरम्यान काही तरुण हे रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. हे तरुण रोज या ठिकाणी व्यायाम करतात. भारतीय संरक्षण दलात जाण्यासाठी म्हणजेच अग्नीवीर होण्यासाठी हे तरुण तयारी करीत होते. त्याचवेळी एक एसटी भरधाव वेगाने तेथून गेली. याच बसचा धक्का या तरुणांना लागला. बस चालकाच्या केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागला आणि दोन तरुणांचे थेट हातच कापले गेले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुणांचे हात अक्षरशः तुटून रस्त्यावर पडले. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली.
विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील या दोन्ही तरुणांचे हात कापले गेले आणि ते ५० ते ६० फूट अंतरावर जाऊन पडले. अपघात लक्षात येताच चालकाने बस थांबविली पण त्यानंतर तो निघून गेला. मात्र ही घटना स्थानिक ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी या दोन्ही तरुणांना मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात दाखल झाला आहे.
दरम्यान, संतप्त जमावाने मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात हल्लाबोल केला. आगार व्यवस्थापक दराडे हे कार्यालयात असताना, या बसचा पत्रा तुटून बाहेर आलेला असूनही आगाराबाहेर कशी काढली, असा सवाल रहिवाशांनी विचाराला. कारण एखादी एसटी बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वी तिची तपासणी केली जाते. परंतु संबंधित बसचा पत्रा बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर पडली आणि पुढील दुर्घटना घडली. या घटनेचा जाब विचारण्यासाठी २०० जणांचा जमाव इथे होता. त्यामुळे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी संबंध बसचालकावर कारवाईची मागणी केली आहे.
ST Bus Major Accident 2 Youth Hand Cut
Buldhana