पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. कधी पेपरमध्ये चुकीचा प्रश्न तर कधी कॉपी पुरविणारे पालक यामुळे यंदा परीक्षा गाजताहेत. या दरम्यान दहावीचे फेक वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर हिंदीचा पेपर न देण्याची नामुष्की ओढवली आहे.
दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वायरल झालेल्या वेळापत्रकाचा फटका बसला आहे. व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवून अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर बुडाला आहे. दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा 8 मार्च रोजी हिंदी द्वितीय भाषा विषयाचा पेपर होता. हॉल तिकीटावर देखील ८ मार्च रोजी हिंदी द्वितीय भाषा विषयाचा पेपर असल्याचं बोर्डाकडून नमूद केलेलं आहे. मात्र आठ मार्चला हिंदीचा पेपर असतानासुद्धा काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवला. या व्हायरल झालेल्या वेळापत्रकामध्ये हिंदी विषयाचा पेपर हा ९ मार्च रोजी होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ८ मार्चचा हिंदीचा पेपर जो हॉल तिकीटवरील वेळापत्रकानुसार होता, तो न दिल्यामुळे या विद्यार्थ्यांची त्या पेपरला अनुपस्थिती लागली आहे.
आता हा आहे पर्याय
हिंदीचा पेपर सोडवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांना जुलै महिन्यात होणारी पुरवणी परीक्षा देता येणार आहे.
SSC Student Hindi Paper Social Viral Confusion