मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका आकलनासाठी देण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने रद्द केला आहे. याऐवजी यावर्षीपासून प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे.
दहावी-बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र, यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती आणि त्यानंतर ही मागणी मान्य करत बोर्डाच्या पेपरच्या निर्धारित वेळेच्या नंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून दिली जाणार आहेत.
असे आहेत वेळेतील बदल
परीक्षेची सध्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ असून सुधारित वेळ आता सकाळी ११ ते दुपारी २.१० असणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये परीक्षेची सध्याची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती. त्यात बदल होऊन सुधारित वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६.१० वाजतापर्यंत असणार आहे.
कोरोनानंतर प्रथमच ऑफलाइन परीक्षा
मागील दोन वर्षे कोरोनामुळे लॉकडाउन होता. परिणामत: दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र, यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दरांवर करडी नजर असणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे आदेश घेण्यात काढण्यात आले आहेत.
SSC HSC Exam Maharashtra Board Big Decision