इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताच्या दक्षिणेला शेजारी असलेल्या श्रीलंकेवर सध्या कर्जबाजारीपणामुळे कंगाल होण्याची वेळ आली आहे, साहजिकच या देशातील नागरिकांमध्ये तीव्र संताप होऊन त्याचा उद्रेक झालेला दिसून येतो. श्रीलंकेत गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आता उग्र रुप धारण केले आहे. याचा भडका होऊन शनिवारी आंदोलनकर्त्यांनी थेट राष्ट्रपती भवनावरच मोर्चा वळवला. त्यामुळे राष्ट्रपती गोयबाया राजपक्षे यांना निवासस्थान सोडून पलायन करण्याची वेळ आली.
विशेष म्हणजे यापूर्वी मे महिन्यातही नागरिकांच्या उद्रेकात राजपक्षे यांचे लहान भाऊ माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेरही आंदोलकांनी घेराव घातला होता. त्यावेळी राजपक्षे कुटुंबीयांनी पळ काढत नेव्हल छावणीत आसरा घेतला होता. राजपक्षे कुटुंबीयांमुळेच देशावर ही वेळ आल्याचा आंदोलकांचा आक्षेप आहे. राजपक्षे परिवाराने देशाला लुटले, असा आरोप आहे.
एप्रिलपर्यंत श्रीलंकाच्या सरकारमध्ये राजपक्षे कुटुंबातील पाच जण सामील होते. यात राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे, अर्थमंत्री बासिल राजपक्षे, जलसिंचन मंत्री चामल राजपक्षे आणि क्रीडा मंत्री नामल राजपक्षे अशी या पाच जणांची नावे. यातील गोटबाया सोडल्यास आत्तापर्यंत सगळ्यांनी राजीनामे दिले आहेत.
एक काळ असा होता की श्रीलंकेच्या राष्ट्रीय बजेटपैकी 70 टक्के वाट्यावर राजपक्षे भावांचा अधिकार होता. राजपक्षे परिवाराने 5.31 अब्ज डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपये देशातून बाहेर नेले, असा आरोप आहे. यात महिंदा राजपक्षे यांचे नीकटवर्तीय अजित निवार्ड कबराल यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यावेळी ते सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेचे गव्हर्नर होते.
महिंदा राजपक्षे (वय ७६) हे त्यांच्या समुहाचे प्रमुख आहेत. गेल्या काही महिन्यांपर्यंत ते पंतप्रधान होते. त्यांच्याविरोधात झालेल्या उग्र निदर्शनांनंतर 10 मे रोजी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. 2004 साली पंतप्रधान राहिलेले महिंदा हे त्यानंतर 2005 ते 2015 या काळापर्यंत देशाचे राष्ट्रपती राहिले. याच काळात त्यांनी भाऊ गोटबाया राजपक्षे यांना तामिळांचे आंदोलन मोडून काढण्याचे आदेश त्यांनी दिले होते. महिंदा यांच्या कार्यकाळातच चीनमधून पायाभूत प्रकल्पांसाठी 7 अब्ज डॉलर्स श्रीलंकेला मिळाले. यातील अनेक प्रोजेक्ट हे कागदावरच राहिले आणि त्यांच्या नावावर देशात प्रचंड भ्रष्टाचार झाला.
पूर्वी सैन्यातील माजी अधिकारी असलेले गोटबाया 2019 साली श्रीलंकेचे राष्ट्रपती झाले. संरक्षण मंत्रालयातील सचिव पदासह इतर अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. 2005 ते 2015 या काळात महिंदा राजपक्षे हे राष्ट्रपती असताना त्यांनी संरक्षण सचिव या पदावरुन तामिळ फुटीरतावादी आणि एलटीटीई संघटनेला नेस्तनाबूत केले. गोटबाया यांनी केलेली करकपात, शेतीत रासायनिक खतांच्या वापरावर घातलेली बंदी अशा धोरणांमुळे आजचे संकट तीव्र झाल्याचे सांगण्यात येते आहे.
श्रीलंकेतील आर्थिक परिस्थितीमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी शनिवारी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला. त्याचवेळी राष्ट्रपती त्यांच्या निवासस्थानातून पळून गेले आहेत. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी श्रीलंकेचे विद्यमान पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
श्रीलंका पोदुजाना पेरामुनाच्या 16 खासदारांनी पत्र लिहून राष्ट्रपतींना तात्काळ राजीनामा देण्याचे आवाहन केले. तसेच आंदोलकांनी राजपक्षे यांच्या शासकीय निवासस्थानाचीही तोडफोड केली. दुसरीकडे, रॅलीदरम्यान श्रीलंकन पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. यामध्ये सुमारे 100 जण जखमी झाले. आता सरकारविरोधी निदर्शक राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या घरात घुसले आहेत.
दरम्यान, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि जलद तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षाचे नेते सभापतींना संसद बोलावण्याची विनंती करत आहेत. तर इकडे आंदोलकांना राष्ट्रपतींच्या निवासस्थानात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, तसेच पाण्याच्या तोफांचा वापर केला आणि गोळीबार केला. तरीही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून अध्यक्षीय निवासस्थानात प्रवेश केला.
Srilanka Economic Crisis Who is Responsible