विशेष लेखमाला – क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद – भाग – १
श्रीअरविंद यांचा जन्म दि. १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रचंड क्षमता असलेले श्रीअरविंद यांचे वडील डॉ. श्री. कृष्णधन घोष हे, शिक्षणासाठी सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये जाणाऱ्या काही लोकांपैकी एक होते. श्री. कृष्णधन घोष भारतात परतले तेव्हा सवयी, कल्पना आणि आदर्श यांबाबत ते पूर्णपणे इंग्रजाळलेले होते. त्यांच्यावर इंग्रजांचा एवढा प्रभाव पडला होता की, आपल्या मुलांना पूर्णपणे युरोपियन पद्धतीनेच वाढवायचे हा जणू श्री. कृष्णधन घोष यांनी पणच केला होता.
घोष कुटुंबीय भारतात रहात होते तेव्हा श्रीअरविंदांना दार्जिलिंगमधील आयरीश ननच्या शाळेत शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. १८७९ साली श्री. कृष्णधन घोष यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना इंग्लंडला नेले आणि तेथे एका इंग्लिश धर्मोपदेशकाकडे व त्याच्या पत्नीकडे सोपविले. त्या तिघांवर कोणतेही भारतीय संस्कार होऊ नयेत वा त्यांचा भारतीयांशी कोणताही परिचय होऊ नये अशी खबरदारी त्यांनी घ्यावी अशा सक्त सूचना त्या पती-पत्नीला देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले. त्यामुळे श्रीअरविंद लहान असताना भारत, भारतातील लोक, भारतीयांचा धर्म, भारतीयांची संस्कृती या साऱ्यांविषयी पूर्णपणे अनभिज्ञच राहिले होते. (क्रमश: …)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Series ShreeArvind Ghosh Part 1