भोपाळ (मध्य प्रदेश) – आंब्याच्या अनेक जाती देशभरात बघायला मिळतात. प्रत्येक प्रदेशातील वातावरण, तेथील माती याला अनुसरून आंब्याचे उत्पादन असते. जेवढ्या प्रकारच्या जाती तेवढी नावे आंब्याला आहेत. पण मध्यप्रदेशातील आदिवासी बहुल आलीराजपूर जिल्ह्यात होणाऱ्या आंब्याचे नूरजहाँ असे नाव आहे आणि एका आंब्याची किंमत तब्बल ५०० ते १००० रुपये असते.
अलीराजपूर येथील कठ्ठीवाडा प्रदेश आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आंब्यासाठीच जगभरात प्रसिद्ध आहे. इथे अफगाणी प्रजातीच्या आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. गुण आणि चवीसाठी त्याचा लौकीक फार मोठा आहे. उत्पादनापूर्वीच जगभरातून त्याचे बुकींग झालेले असते. एका आंब्याची किंमत दोन ते अडीच किलो एवढी असते आणि या एका आंब्याची किंमत ५०० ते १००० रुपये एवढी असते. सध्या केवळ खरेदी करण्यासाठी नव्हे तर झाडाला लागलेले आंबे बघण्यासाठी देखील या प्रदेशात प्रचंड गर्दी असते. आता डिजीटल युगात या आंब्यांसाठी आनलाईन बुकींग देखील केले जाते. येथील एका फार्म हाऊसच्या मालकाने सांगितले की वातावरणातील बदलांमुळे नूरजहाँ आंबा यंदा डिसेंबरमध्येच आला. एरव्ही फेब्रुवारीमध्ये या आंब्याचे उत्पादन होत असते. तीन महिन्यांपूर्वीच आंबे आल्यामुळे यंदा उत्पादनही अधिकचे झाले आहे. कोरोनामुळे मात्र विक्रीवर थोडाफार परिणाम झाला आहे.
साडेतीन किलो वजनाचा आंबा
नूरजहाँ आंब्याचे कमाल वजन साडेतीन किलोपर्यंत नोंदविण्यात आले आहे. मात्र यंदा एवढ्या वजनाचा आंबा बघायला मिळाला नाही. एका फार्म हाऊसवर सात झाडांवर जवळपास ५०० आंबे लागले आहेत. कृषी वैज्ञानिकांनी या प्रदेशातील वातावरण व मातीच्या वैशिष्ट्यांमुळे केवळ नूरजहाँच नाही तर इतर प्रजातीच्या आंब्यांचेही उत्पादन याठिकाणी खूप जास्त असल्याचे म्हटले आहे.