असे आहे शनी जयंतीचे महात्म्य

शनी जयंती महात्म्य
यंदाच्या वर्षी शनी जयंती १० जून म्हणजेच वैशाख शुद्ध आमावस्या या दिवशी साजरी होणार आहे. याच दिनाचे महत्त्व आपण जाणून घेऊ या…
– पंडित दिनेश पंत
सूर्यपुत्र शनीचा जन्मदिवस शनि जयंती म्हणून साजरा केला जातो. शनीची पीडा कोणालाच नको असते. परंतु शनी ही न्याय देवता आहे. आपण केलेल्या कर्माचे फळ शनी आपल्या पदरात टाकत असतो. नवग्रह पैकी  शनीचा फेरा हा अनेकांना विशेष जाणवतो, अशी भाविकांमध्ये मान्यता आहे.
जसे आपले कर्म तसे फळ मिळते. यावेळची शनी अमावस्या ९ जूनला दुपारी ०१:५७ ला सुरु होऊन १० जूनला दुपारी ४ वाजून २२ मिनिटांनी संपते. या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. परंतु हे भारतातून दिसणार नसल्याने ग्रहण संबंधी नियम पाळू नये.

शनी पूजन
घरामध्ये पाटावर काळे वस्त्र अंथरून त्यावर शनि प्रतिमा ठेवावी. धूप, दीप, नैवेद्य झाल्यानंतर निळ्या रंगाच्या गोकर्ण फुलांचा हार अर्पण करावा. शनि चालिसा, शनी मंत्र, शनी जाप अथवा शनी चालिसा त्याचे पठण करावे. काही भक्तांमध्ये या दिवशी संपूर्ण काळे वस्त्र घालण्याचा प्रघात आहे. शनीची आरती करून प्रसाद वाटप करावे. तर या संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. शनी जयंती दिवशी दानधर्माला विशेष महत्व आहे.
शनीची साडेसाती
कुंडली शास्त्राप्रमाणे शनी ग्रहाची साडेसाती ही फार त्रासदायक असते, असे म्हटले जाते. साडेसाती म्हणजे प्रत्येकी अडीच वर्षाचे तीन भाग होय. हे तीन भाग एका रांगेतील तीन राशींमध्ये विभागलेले असतात. यावर्षी धनु, मकर व कुंभ या राशी पैकी धनु राशीला साडेसातीची पहिली अडीचकी, मकर राशीला प्रत्यक्ष साडेसाती तर कुंभ राशीला तिसरी अडीचकी आहे. या राशीच्या भक्तांनी नियमित शनी उपासना करावी, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे कुंडलीतील शनीच्या स्थानापासून शनीची दृष्टी असलेल्या तिसऱ्या, सातव्या व दहाव्या स्थानावर शनीचे शत्रू ग्रह असल्यास अशा भक्तांनी शनी उपासना करण्याचा शास्त्रअर्थ आहे.
कुंडलीच्या लग्न घरात शनी असता किंवा राशीस्वामी शनी असता नीलम रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या कुंडलीतील बारा स्थानांपैकी शनी ग्रह कोणत्या स्थानामध्ये, कोणत्या राशी ग्रह सोबत विराजमान आहे, त्यानुसार शनी आपल्या लाभात आहे की नाही त्याचे अनुमान ज्योतिष तज्ज्ञ काढतात.