इंडिया दर्पण विशेष लेखमाला – सुप्रसिद्ध दत्तस्थाने
दत्त भक्तांची पंढरीः श्रीक्षेत्र गाणगापूर
दत्तांचा चौथा अवतार : कालाग्निशमन
श्री दत्तात्रेय यांनी अत्रिमहर्षि व सती अनसूया यांच्या उदरी प्रत्यक्ष औरसरुपाने जो चौथा अवतार घेतला तो कालाग्निशमन या नावाने ओळखला जातो. दत्तात्रेयांच्या सोळा अवतारातील श्री कालाग्निशमन भगवान दत्तात्रेयांचा हा प्रमुख अवतार मानला जातो. अत्रि आणि अनसूया यांच्या तपश्चर्येचे हे मूर्तिमंत फल असल्यामूळे त्याला स्वाभाविक प्राधान्य प्राप्त झालेले आहे.
ऋक्ष पर्वतावर केलेल्या खडतर तपश्चर्येने अत्रिऋषींच्या शरीरामध्ये एक प्रकारचे प्रखर तेज निर्माण झाले. त्या तेजाने अत्रिमुनींच्या अंतरंगाचा दाह होऊ लागला. सर्वज्ञ भगवान श्रीहरि यांनी ही गोष्ट जाणली आणि ते अत्रिमुनींच्या शरीराचा दाह शमविण्याकरिता श्रीहरिने अत्रिमुनींच्या अंतरंगात प्रवेश केला. या वेळी परमेश्वराचे तेज कोटिचंद्राप्रमाणे अत्यंत शीतल व आल्हादायक होते.अत्रिमुनींच्या हृदयाच्या पोकळीत प्रवेश करुन अत्रिमुनींच्या देहाला नखशिखान्त शांत व शीतल केले. अत्रिमुनींचा ताप निवाला. याप्रमाणे कालाग्नीचा ताप शमविल्यामूळे अत्रिमुनींच्या पोटी जन्मास आलेल्या पुत्राला कालाग्नीशमन असे नाव देण्यात आले.
दत्तात्रेयांनी घेतलेला हा कालाग्नीशमन नावाचा प्रधान अवतार मार्गशीर्ष महिन्यात झाला. सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष श्रेष्ठ मास मानला जातो. कारण तो प्रत्यक्ष परमेश्वराचाच अंश आहे. तो परमात्मस्वरुपच आहे. शिवाय हा महिना अन्नधान्याने समृद्ध असतो. दत्तात्रेय अवतरले त्या दिवशी पोर्णिमा होती, शुक्ल पक्ष होता, बुधवार होता. मृग नक्षत्र होते.
जन्म:- मार्गशीर्ष शुद्ध १५
श्रीक्षेत्र गाणगापूर दत्त भक्तांची पंढरी

मो. ९४२२७६५२२७
गाणगापूरचे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढीलप्रमाणे वर्णन आढळते.
श्री गुरुनृसिंह सरस्वती । अवतार असे त्रिमूर्ती
गाणगाग्रामी असे ख्याती । जे जाती तया स्थाना
तात्काळ होती मनोकामना । काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे ||
गाणगापूर ग्रामी श्रीदत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वत: गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्तरुपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे.
प्रत्यक्ष देव गाणगापूरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व येथेच थांबले आहेत. कोणीही श्रद्धेने या व कृपाशिर्वाद प्राप्त करुन घ्या असा महाराजांचा संदेश आहे. याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा-अमरजा संगमावर करुन दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्तरुपाने कोणत्याही वेषात उपस्थित असतो असे महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असूनसुद्धा श्री गुरुंना आपण ओळखू शकत नाही. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्र्वास ठेवला तर देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे.
श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापूरातून निघताना आपल्या पादूका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत. परंतू निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रुपाने वास राहील. निर्गुण पादुका मठात ठेवतो. येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणतीही शंका ठेवू नका आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहे.
श्रींक्षेत्र गाणगापुर दर्शन
गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार “श्री नृसिंह सरस्वती” महाराज यांनी २२ ते २३ वर्ष वास्तव्य केले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये, संगम स्थान (भीमा +अमरजा नदी संगम), निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे, या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे. तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. कल्लेश्र्वर हे मुक्तीस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे.
भीमा व अमरजा संगमस्थान
भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे. हा संगम निर्गुण मठापासून २ ते ३ किलोमीटर आहे. या संगम स्थानी “भगवान श्री नृसिंह सरस्वती” नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुणमठाच्या पादुकादर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते.
अष्टतीर्थांचा नित्य वास
गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे. ही अष्टतीर्थे पुढीलप्रमाणे होत –१) षट्कुल तीर्थ, २) नृसिंह तीर्थ, ३) भागीरथी तीर्थ, ४) पापविनाशी तीर्थ, ५) कोटी तीर्थ, ६) रुद्रपाद तीर्थ, ७) चक्रेश्र्वर तीर्थ व ८) मन्मथ तीर्थ. भागीरथी तीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने श्रीमहादेवांनी काशीची गंगा तिथे आणली. श्रीपापविनाशी तीर्थावर श्रीमत्परहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थांवर श्री नृसिंहसरस्वतींनी आपल्या भगिनीला-रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली.
श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्त जनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चातुर्दशीचा! याबाबत सविस्तर माहिति “श्री गुरु चरित्र” ह्य पवित्र ग्रंथात ४९ व्या अध्यायात आली आहे.
औदुंबर वृक्षाचा महिमा
श्रीगुरुचरित्रातील चाळीसाव्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही इथे दर्शन घडते. श्रीनरहरी नामक ब्राह्मण श्रीगुरुआज्ञेने शुष्ककाष्ठाला नेहमी पाणी घालीत असे. पुढे श्रीगुरुकृपेने त्या वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी आली. इथला श्रीनृसिंह सरस्वतींचा ‘विश्रांतीचा कट्टा’ ही सुप्रसिद्ध आहे. श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामीमहाराज संगमावरून गाणगापूर ग्रामात जात येत असताना या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत असत. श्रीमहाराजांच्या कृपामृत दृष्टीने फुलून आलेले त्या भाग्यवान शेतकऱ्याचे शेत याच विश्रांती कट्ट्याजवळ आहे.
संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्याआहेत. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झालेले आहेत. आपणास कधीहि गाणगापूर येथे जाण्यास योग आल्यास संगमी स्नान करून औदुंबरास -११,२१,१०८ प्रदक्षिणा नक्की घाल्याव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे. या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक “गुरुचरित्र” या जागृत ग्रंथाचे पारायण करतात.
दिव्य स्थळ: “भस्माचा डोंगर”
भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे. सदरील भूमीमध्ये अनेक ऋशी मुनींनी केलेली तप साधना यामुळे या तपोभूमितील “विभूती” अनेक भाविक घरी घेऊन जातात, त्याच प्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासठी येथील पाषाणा द्वारे रचना तयार करायची एक पद्धत येथे प्रचलीत आहे.
श्रीक्षेत्र गाणागापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो. हजारो वर्षांपासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते. त्याच यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली आहे. आजपर्यंत लक्षावधी श्रीदत्तभक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेउनही ही भस्माची टेकडी आहे तशीच आहे. श्रीक्षेत्र गाणगापूरच्या भस्माने पिशाच्च बाधा हटते. दृष्टिबाधा नाहीशी होते. रोगराई नाहीशी होती. हे भस्म संकटनाशक, दुरितहारक आहे. परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात. संन्यासीवृंद भस्मस्नानासाठी याच भस्माचा उपयोग करतात.
दिव्य निर्गुण पादुका
दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी “श्री नृसिंहसरस्वती” महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपाचारांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.
‘दत्त भक्तांचे पंढरपूर’
श्रीक्षेत्र गाणगापुराला ‘दत्तभक्तांचे पंढरपूर’ म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. ‘निर्गुण पादुका’च्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे.
झरोक्यातून होणारे मनोहर श्रींचे दर्शन
आज श्री क्षेत्र गाणगापुरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिह सरस्वती निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत आज ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगत की, त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र, स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली.
श्रीनृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्च विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करुन श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवीत आहेत.
श्रीनिर्गुण पादुका मंदिर
श्रीनिर्गुण पादुका मंदिर (अथवा श्रीगुरूंचा मठ) हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेस व पश्र्चिमेस दोन महाद्वारे आहेत. पश्र्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजविला जातो. नव्यानेच बांधण्यात आल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे.
श्रीनिर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्या खाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्र्चिमेस अश्र्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाभोवताली नागनाथ, मारुती व तुलशीवृंदावन आहे. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवऱ्या आहेत. त्यांपैकी पाच पूर्वेस, सात उत्तरेस व एक पश्र्चिमेस आहे. मठाच्या दक्षिणभागी श्रीगुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे.
आत पश्र्चिमेकडील कोनाड्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वत: श्रीनृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्र्चिमाभिमुख आहे. या दरवाज्यातून ओणव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रैमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्र्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्रीगुरुंच्या ‘निर्गुण पादुका’ ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत.
श्रीनृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा-अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारणत: ३ कि.मी.वर आहे. श्रीगुरू ज्या अश्र्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्याच स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. याच मंदिरात अश्र्वत्थवृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे.
कलेश्वर तीर्थ
श्रीगाणगापूर क्षेत्राच्या पूर्वभागात श्रीकल्लेश्र्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. इथला पुजारी नरकेसरी कल्लेश्र्वराशिवाय अन्य कुणाला मानत नसे. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला. श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते.
प्रत्येक भाविक माधुकरी मागतात
श्रीक्षेत्र गाणागापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात. स्वत: श्रीनृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत. दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्रीमहाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्र्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यशाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्रीदत्तमहाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते.
नित्त्यक्रम
श्रीक्षेत्र गाणगापूर येथील नित्यक्रम पुढीलप्रमाणे असतो – रोज पहाटे तीन वाजता काकड आरती होते. त्यानंतर साडेपाच ते सहाच्या सुमारास कर्पुरारती होते. साडेसहा वाजता तीर्थारती होते. इथे पादुकांवर पूजेचे उपचार होत नाहीत. पादुकांवर पाणी घातले जात नाही. केवळ अष्टगंध व केशरी गंध लावतात. इतर उपचार ताम्हणात पाणी सोडून करतात. साडेबाराच्या सुमारास श्रीदत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो. नंतर भक्तमंडळी माधुकरी मागावयास जातात.
श्रींचा पालखी सोहळा
सायंकाळी सहा-साडेसहा वाजता दिवे लागतात. रात्रौ साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत श्रीदत्तप्रभुंच्या पालखीचा सोहळा चालतो. प्रथम पूजा, आरती झाल्यानंतर अलंकाराने सुशोभित अशी श्रीदत्तप्रभूंची मूर्ती पालखीत बसवतात. मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घालतात. याच काळात पालखीसमोर भजनसेवाही होते. त्यानंतर श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीकृत करुणा त्रिपदी, पदे, अष्टके आणि शेजारती म्हणण्याचा कार्यक्रम होतो. नंतर तीर्थप्रसाद दिला जातो.
साजरे होणारे उस्तव
श्रीक्षेत्र गाणगापूरला पुढील उत्सव साजरे केले जातात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला (श्रीगुरुपौर्णिमेला) श्रीव्यासपूजा साजरी करतात. संपूर्ण श्रावण महिनाभर भक्तमंडळी श्रीगुरुचरित्राचे पारायण करतात. मठात रोज शिवलिंगावर रुद्राभिषेक होतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी (गणेश चतुर्थीच्या दिवशी) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा करतात. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी श्रींची पालखी भक्तमंडळींसह सायंकाळी श्रीकल्लेश्र्वर मंदिरात जाते. रात्रौ आठ वाजता परत येते. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतारसमाप्तीचा उत्सव आश्र्विन वद्य द्वादशीला म्हणजे गुरुद्वादशीला मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्या वेळेस महाप्रसाद वाटला जातो.
योगिनी दर्शन
नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्व भाविक भक्त अष्ट तीर्थ स्नान करण्यासाठी जातात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी संगमावर जाते. त्याच रात्री भजनाच्या व नामस्मरणाच्या गजरात ती परत मठात येते. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी श्रीदत्तजयंतीनिमित्त येथे मोठा उत्सव होतो. दुपारी बारा वाजता दत्तजन्म साजरा करण्यात येतो. या उत्सवाला बाहेरगावची माणसे फार मोठ्या प्रमाणावर आलेली असतात. पौष शुद्ध द्वितीयेला श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.
माघ वद्य प्रतिपदा हा श्रीक्षेत्र गाणगापूर येथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव होय. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी श्रीमहाराज श्रीशैल्यगमनास निघतात. चतुर्थीच्या दिवशी श्रीदत्तप्रभूंची पालखी रुद्रपाद तीर्थांहून पुनश्र्च मठात येण्यास निघते. हा सर्व सोहळा अत्यंत आनंदमय, मनाला स्फूर्ती देणारा असतो.
निवासाची सोय
भक्तांच्या निवासाची सोय इथल्या वेगवेगळ्या धर्मशाळांतून अत्यंत माफक दरात केली जाते. या सर्व धर्मशाळा देवस्थान कमिटीच्या मालकीच्या आहेत. श्रीवासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा अलीकडेच उभारण्यात आली आहे. श्रीविश्र्वेश्र्वर मठ, श्री दंडवते स्वामीमहाराजांचा मठ, श्रीशंकरगिरी महाराज मठ वगैरे मठांतूनही भक्तांच्या राहण्याची सोय होऊ शकते.
कसे जावे:
मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावर गाणगापूर हे स्टेशन (स्थानक) लागते. पुणे-रायचूर मार्गावर गुलबर्गा स्टेशनपूर्वी गाणगापूर स्टेशन आहे. पुण्यापासून या स्टेशनचे अंतर ३२७ कि.मी आहे. तेथून पुढे २१ कि.मी श्रीक्षेत्र गाणगापूर आहे. तेथे जाण्यासाठी कर्नाटक राज्याच्या एस. टी. गाड्यांची सतत ये – जा चालूच असते. मणीगिरी तथा मणिचलच्या पायथ्याशी हे पवित्र तीर्थक्षेत्र वसलेले आहे. बसमार्गाने सोलापूर-गाणगापूर अशी थेट बस सेवा आहे. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.
संपर्क :
श्री दत्त संस्थान गाणगापूर, श्रीक्षेत्र गाणगापूर, तालुका अफझलपूर, जिल्हा कालबुर्गी, कर्नाटक राज्य.
संदर्भ : श्री गुरुचरित्र, धार्मिक ग्रंथ